‘वुमेन्स शॉपिंग फेस्ट’ला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे १७ ते १९ मे या कालावधीत मराठा भवन येथे वुमेन्स शॉपिंग फेस्टचे आयोजन केले होते. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रदर्शनाचे उद्घाटन राम मंदिर व मंगलमूर्ती प्रतिष्टानच्या अध्यक्षा सौ. उर्मिला घोसाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर रोटरी अध्यक्ष श्रीकांत भुर्के , सेक्रेटरी प्रमोद कुलकर्णी, जेष्ठ सदस्य धरमसी चौहान , सौ. अंजली इंदुलकर आणि इव्हेंट चेअरमन वेदा मुकादम उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन विनायक हातखंबकर यांनी केले. रोटरी अध्यक्ष श्री. भुर्के यांनी महिला उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी हे फेस्टिवल आम्ही भरवले असल्याचे प्रास्ताविकात नमूद केले. प्रमुख अतिथी सौ. घोसाळकर यांनी महिला उद्योजकांना व्यवसाय कसा वाढवला पाहिजे हे स्व उदाहरणातून सांगितले.
रोटरी वुमेन्स शॉपिंग फेस्टमध्ये साधारण ३० महिला उद्योजकांनी सहभाग नोंदवला आणि ज्वेलरी , ड्रेस मटेरियल, तयार ड्रेस , साड्या, कॉस्मेटिक अशा विविध प्रकारचे स्टॉल या प्रदर्शनात मांडले.
याच सभागृहात ‘रोटरी’ने रोटरी लोक कल्याण मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जयपूर फूट कॅम्प – कृत्रिम पाय रोपण शिबीर भरवले होते. यात १२ लाभार्थींना कृत्रिम पाय बसवण्यात आले.
तसेच रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि वृक्षवल्ली रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुंदर माझी बाग’ ही अभिनव स्पर्धा भरवली होती. त्याचा बक्षीस समारंभ झाला. ‘ओपन आऊटडोअर गार्डन’ आणि ‘टेरेस गार्डन’ अशा दोन विभागात ही स्पर्धा झाली. यात ओपन आऊटडोअर कॅटेगरीमध्ये किशोर कारेकर (आठवडा बाजार, रत्नागिरी) यांना प्रथम, सौ. सारा पाटील यांना द्वितीय, तर तृतीय क्रमांक उद्धव पटवर्धन (शांती नगर, रत्नागिरी) यांना देण्यात आला. ‘टेरेस गार्डन कॅटेगरी’मध्ये संदीप पावसकर (परटवणे, रत्नागिरी), साई अनिषा मुरकर (भाट्ये, रत्नागिरी) यांना प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. याबरोबरच रत्नागिरीतील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे १९ मे रोजी कॉलेजच्या माजी छात्रांनी त्यांनी कोर्सेमध्ये डिसाइन केलेल्या विविध ड्रेसचा एक फॅशन शो देखील सादर केला.




