रत्नागिरी लोकसभा : सरताज कोणाकडे (भाग १)

-अभिजीत हेगशेट्ये
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एका एका मतदारसंघाचा निर्णय हा देशाच्या लोकसभेतील सत्तेचे मानकरी होणार याचे भविष्य आणि भवितव्य ठरविणारा आहे. यामुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा हे महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात सभा, रोडशो या माध्यमातून प्रचाराची धुळवड उडवित आहेत. यातील भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा असणारा रत्नागिरी मतदारसंघातील मतदान नुकतेच पार पडले. मागील वेळेपेक्षा मतांची आकडेवारी घसरली त्यामुळे यावेळी भाजपचे नारायण राणे निवडून येणार की, विनायक राऊत आपली हॅटट्रिक करणार हा अत्यंत उत्सुकतेचा आणि तितकाच तणावाचा विषय ठरला आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपचे उमेदवार विनायक राऊत यांनी मतांचा उच्चांक करत ४ लाख ५८ हजार ०२२ मते मिळविली होती. त्यावेळी नीलेश राणे हे स्वाभिमान ह्या त्यांच्याच पक्षाचे उमेदवार म्हणून उभे होते, म्हणजे जणू अपक्षच; मात्र तरीही त्यांना २ लाख ७९ हजार ७०० मते मिळाली होती. यावेळी शिवसेनेचे राऊत १ लाख ७८ हजार ३२२ मतांच्या फरकाने निवडून आले होते. तरीही राणे यांची ती स्वतःच्या व्यक्तिगत क्षमतेची मते होती, हा भाग फार महत्त्वाचा आहे. यावेळी नारायण राणे लोकसभेच्या निवडणुकीला या मैदानात उतरताना या हक्काच्या मतांसोबत शिंदे यांची शिवसेना आणि अजित दादांची राष्ट्रवादी अधिक भाजप अशा मोठ्या शक्तीने उतरले. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेचे मागील लीड तोडून ते सहज अधिक मताधिक्य घेतील, असा विश्वास ते व्यक्त करत होते. त्यांचा आत्मविश्वास हा तीन लाख मताधिक्याचा होता; मात्र यावेळी मतांची संख्याच घटल्याचे दिसत आहे. एकूण १४ लाख ५१ हजार ५६२ मतदानापैकी फक्त ८ लाख ७ हजार ५६२ मतदान झाल्याची नोंद मिळत आहे. यामुळे ही गणितं फार वेगाने बदलणार आहेत.
या मतदारसंघात भाजप आणि महायुतीचा उमेदवारच नक्की होत नव्हता तोपर्यंत ठाकरे शिवसेनेचे विनायक राऊत यांनी मतदारसंघाचे दोन प्रचार दौरे पूर्ण करत एकतर्फीच आपली मशाल पेटविली होती.
महायुतीत दिल्लीश्वरांनी ही जागा भाजपसाठी इतकी काही प्रतिष्ठेची केली की, “अब नही तो कभी नही” असाच मेसेज आला; मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी किरण सामंत यांच्यासाठी अखेरच्या घटकेपर्यंत किल्ला लढवत ठेवला होता. रत्नागिरीच्या रणांगणात थेट अमित शहाच उतरले होते. त्यामुळे नारायण राणे यांच्यापेक्षा अमित शहा यांच्यासाठी ही जागा फारच प्रतिष्ठेची झाली आहे. या वातावणात भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यापेक्षा इच्छुक उमेदवार किरण सामंत यांच्या स्टेटस, डीपी, यांच्या चर्चा ह्या नॅशनल न्यूज झाल्या. त्यांचे नागपूरला फडणवीस यांना स्पेशल चार्टर्डने जाऊन भेटणे, दिल्लीत अमित शहांशी भेट घेणे, मतदानाच्या दिवशी ‘नॉट रिचेबल’ हेच फार गाजत राहिले (कॉलेजच्या निवडणुकीतील गंमतींची आठवण करून देणारे) या राजकीय कलहात विद्यमान खासदार विनायक राऊत यांचे पारडे दिवसागणीक जडच होत राहिले. तिसऱ्या टप्प्यांत असणारी ही निवडणूक सुरूवातीला एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप, कामाचा लेखाजोगा यावर प्रचारात भर देणारी होती. यात नारायण राणे हे कोकणच्या राजकारणात ३५ वर्षे मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता ते केंद्रीय मंत्रीपदे असा भव्य राजकीय पट लाभलेले. त्यांच्या काळातील विकासकामाची यादी सुरू केल्यास ती रस्ते, पाणी योजना यापलीकडे फारशी सरकत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी स्वतःचे मेडिकल कॉलेज, इजिनिअरिंग महाविद्यालय असे काही प्रकल्प आणले. परंतु कोकणच्या मुलभूत अर्थव्यवस्थेला नवा आयाम देणारे (चिपी विमानतळ, सीवर्ल्ड प्रकल्प आदी) कोणतेच प्रकल्प वर्षानुवर्ष झाले तरी पुर्णत्वाकडे जाऊ शकले नाहीत. विनायक राऊत यांच्या बाजूने १० वर्षांतील कार्यकाळ हा क्रांतीकारी परिवर्तनाचा वगैरे म्हणण्यासारखा काहीच नव्हता. ते सत्तेच्या परिघात आले नाहीत त्यामुळे संधी मिळाली नाही असे म्हणतात; मात्र त्यांचा या मतदारसंघातील जनसंपर्क अफाट आहे. जनतेची अगदी लहानसहान कामालाही त्यांच्याकडे प्राधान्य आहे आणि सर्वसामान्यातील सर्वमान्य असा कार्यकर्ता ही त्यांची सकारात्मक इमेज त्यांची प्रचंड अॅसेट आहे.
देशातील पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आणि देशातील निवडणुकीचा माहोलच बदलू लागला. इंडिया आघाडीविरोधात भाजप महायुती अशी असणाऱ्या लढतीत महायुती फक्त एकाच नावाने निवडणूक मैदानात होती ते म्हणजे नरेंद्र मोदी. ‘मोदी है तो मुमकीन है’, ‘मोदींना मत म्हणजे विकासाला मत’, ‘मोदी की गॅरेंटी’ अशा घोषवाक्यांमुळे संपूर्ण देश हा मोदी यांच्या नावानेच निवडणूक लढत आहे, असा माहोल. या माहोलाला पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानात जोरदार तडाखा बसल्याची जाणीव भाजप आणि मोदी यांना झाली. ‘चारसौ पार’वर संविधान बदलण्याच्या कारस्थानाचा आरोप भाजपला फारच वर्मी लागला आणि प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड बॅकफुटवर गेले. त्यांनी निवडणुकीच्या आखेलेल्या स्ट्रटॅजीला राहुल गांधी यांनी मुळातच सुरुंग लावला. राहुल गांधी देशातील विषमतेची ९० टक्क्यांना डावलल्याचे गणित मांडू लागले. देश २० उद्योगपतींना कसा विकला जात आहे, येथे आरक्षण संपविण्याची मांडणी खासगीकरणातून कशी होत आहे आणि रोजगार कसा पळविला जात आहे, हे सर्वसामान्यांना फारच अपील होते. देशातील मीडिया हे काही दाखवत नव्हता; मात्र रविश कुमारचा युट्यूब चॅनेल एक कोटी लोक पाहू लागले आणि एक नवे वादळ घोंगावू लागले. याचवेळी पंतप्रधानांनी थेट महिलांच्या मंगळसूत्राचा विषय घेत मुस्लिम मतदारांना टार्गेट केले. मुख्यमंत्री केजरीवाल, सोरेन यांना तुरुंगात टाकले. यातून इंडिया आघाडीचा वणवा साऱ्या देशभर पेटून उठला. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा प्रचार हा नारायण राणे विरोधात विनायक राऊत असा राहिलाच नाही, तर थेट मोदी विरोधात इंडिया आघाडी असा सुरू झाला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली सेनेची उपमा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आणि अस्मितेचा भडका अधिक पेटून उठला. उद्धव ठाकरे नावाचे वादळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घोंगावू लागले. याची दखल साऱ्या देशाने घेतली. उद्धव ठाकरे बल प्रचंड सहानुभूतीची लाट महाराष्ट्रातील सर्वसामान्य शिवसैनिकाला चेतवून गेली.
रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांचा अनेक वर्षांचा विविध क्षेत्रात जोडला गेलेला मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहे; मात्र पंतप्रधानांच्या आक्रमक वक्तव्याने दुफळीचे वातावरण पहिल्यांदाच इतक्या तीव्रतेने झाले. या मतदारसंघात जवळपास दीड लाख मुस्लिम मतदार आहे. तो पूर्णपणे इंडिया आघाडीकडे सरकला आहे. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर होता बौद्ध समाज. संविधानच बदलू पहाणाऱ्या या सरकारविरोधात त्यांचे मत झाले, ते राणे यांच्यासाठी फार त्रासदायक आहे.
‘निर्भय बनो’ चळवळीने या मतदारसंघातील मतदारांना देशातील सध्य परिस्थितीचे राजकारणाच्या पलीकडच्या घडामोंडीचे मार्गदर्शन दिले. त्याचा प्रतिसाद विलक्षण लक्षवेधी होता. उद्धव ठाकरे यांच्या या मतदारसंघातील सभाही तुफानी होत्या. त्यावर मात करणारी थेट अमित शहा यांची सभा रत्नागिरी येथे झाली; मात्र तिचा प्रभाव चर्चेत आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी रत्नागिरीत सभा घेणार नाहीत हे निश्चित होते. कारण त्यांनी २०१४ मध्ये बाळ माने यांच्यासाठी येथे सभा घेतली त्यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता; मात्र उदय सामंत निवडून आले होते. ह्या परिस्थितीत या मतदारसंघातील निवडणुकीत नारायण राणे सतत सांगत होते ‘मला मत हे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मत’ आणि विनायक राऊत सांगत होते, ‘देशाचे संविधान बदलू पहाणाऱ्या हुकुमशाहीला गाडण्यासाठी संविधानाच्या संरक्षणासाठी उद्धव ठाकरे यांना मत द्या’ या मतदारसंघातील निवडणूक ही थेट देशपातळीवरच लढली गेली.
(क्रमश:)


