Uncategorized

नदीतील गाळ काढण्यास प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्था प्राधिकरण बैठक

रत्नागिरी : “पाटबंधारे विभागाने नदीपात्रातील गाळ काढण्यास प्राधान्य द्यावे. जुन्या इमारती, पूल, शाळा यांचे संबंधित विभागांनी स्ट्रक्चरल ऑडिट करावे, तसेच सर्वच विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडे २० मेपर्यंत पाठवावेत”, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सूनपूर्व तयारी २०२४ आढावा बैठक आज (१६ मे) घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी विभागनिहाय सविस्तर पूर्व तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले, “सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली सुरू असल्याबाबत गटविकास अधिकारी नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी तपासून खात्री करावी. प्रत्येक तहसीलदरांकडे सॅटेलाईट फोनचे वितरण करा. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्याची तयारी ठेवावी. तालुकास्तरीय यंत्रणेने आपल्याकडील असणारी साधनसामुग्री सुस्थितीत आहे का याची तपासून खात्री करावी. पाटबंधारे विभागाने नद्यांमधील विशेषत: शहरालगतच्या भागातील गाळ काढण्याचे काम अधिक सक्रीय आणि प्राधान्याने करावे. धोकादायक ठिकाणी इशारे देणारे फलक उभारावेत. नियंत्रण कक्षाची स्थापना करून जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्कात रहावे.”
“आयएमडीकडून पावसाचा इशारा मिळताच, आरोग्य विभागाने आपल्या रुग्णवाहिका त्या-त्या तालुक्यात तयार ठेवाव्यात. आवश्यक ती सर्व पूर्वतयारी ठेवावी. नगरपालिकांनी आपल्या हद्दीतील जुन्या इमारतींचे ऑडिट करावे. पूर नियंत्रण आराखड्याबरोबरच स्थलांतराचा आराखडाही तयार ठेवावा. महावितरणने जीर्ण पोल बदलावे, धोकादायक झाडांच्या फांद्या तोडणे जलद कृती पथक तयार करणे आदी कामे करावीत. लोटे एमआयडीसी असोसिएशनची बैठक घेऊन सतर्क करावे. शिक्षण विभागाने धोकादायक शाळा, छत दुरुस्ती आदी बाबतची कामे करावीत,” असेही जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले.
पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी स्थानिक प्रशासनाने आपल्या स्तरावर बैठक घेवून सूक्ष्म नियोजन करावे तसेच पडलेली झाडे हटवण्यासाठी कटरसारखी साधन सामुग्री व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना केल्या.
तत्पूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरण करून गेल्या वर्षी झालेला सरासरी पाऊस, २०११ ते २०२३ कालावधीत झालेला सरासरी पाऊस, आपत्तींचा पूर्वानुभव, पूर प्रवण, दरड प्रवण गावे, रासायनिक कारखाने, धोकादायक कारखाने आदींबाबत सविस्तर माहिती दिली.

१५.२० लक्ष घमी गाळ उपसा
चिपळूण येथील वाशिष्ठी नदीतून १० लाख ४९ हजार घमी व शिव नदीतून नाम फौंडेशनमार्फत शिव नदीतून ४ लाख २ हजार २२२ घमी असा एकूण १५.२० लक्ष गाळ काढण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी आपल्या सादरीकरणात दिली.
या बैठकीला विविध विभागांचे प्रमुख, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button