मुख्य बातमी

रत्नागिरीत शनिवारी रंगणार लक्ष्मण गाड स्मृती शास्त्रीय मैफल

रत्नागिरी : ग्वाल्हेर-आग्रा घराण्याचे प्रतिभावान गायक आणि पं. अरुण कशाळकर, पं. शरद साठे यांचे शिष्य मुकुल कुलकर्णी यांच्या शास्त्रीय गायनाची तसेच गोव्यातील कलाकारांच्या तबला एकल वादनाची पर्वणी रत्नागिरीकरांना एकत्रित अनुभवता येणार असून ही शास्त्रीय संगीत मैफल ११ मे रोजी रत्नागिरीत रंगणार आहे.
येथील स्वराभिषेक संगीत वर्गाच्या संचालिका सौ. विनया परब यांचे वडील गोव्यातील प्रसिद्ध भजनी मास्तर कै. लक्ष्मण गाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ही मैफल रत्नागिरीत सादर होते. ११ तारखेला सायंकाळी ५ वाजता थिबा पॅलेसजवळील स्वामी गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर ही मैफल होईल. मैफिलीच्या पहिल्या सत्रात गोव्यातील सुप्रसिद्ध तबलावादक अमर मोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली तबल्याची तालीम घेणारे सर्वेश गावस व स्मरण सतरकर यांचे तबला एकल वादन होईल. त्यानंतर मुकुल कुलकर्णी शास्त्रीय गायन सादर होईल. श्री. कुलकर्णी यांनी भारतातील अनेक नामवंत संगीत संमेलनात सादरीकरण केले असून परदेशातही अनेक मैफली रंगवल्या आहेत. तसेच दादर माटुंगा कल्चरल सेंटर व सीसीआरटीची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे. या मैफलीसाठी त्यांना अमर मोपकर आणि संवादिनीवादक दत्तराज माळशी हे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचा संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन स्वराभिषेक संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button