रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात अंदाजे ६४ टक्के मतदान : निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह
शांततेत आणि सुरळीत मतदान : कुठेही अनुचित प्रकार नाही

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आज (७ मे) सर्वत्र शांततेत आणि सुरळीत अंदाजे ६४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी ५वाजेपर्यंत ४ लाख ८ हजार ७४५ इतक्या पुरुष, तर ३ लाख ९८ हजार ८१६ इतक्या महिला अशा एकूण ८ लाख ७ हजार ५६२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघात मतदानावेळी कुठेही अनुचित प्रकार झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी विविध ठिकाणी आज अगदी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. प्रशासनाने उन्हाची तिव्रता लक्षात घेऊन मंडप, पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प आदींची सुविधा केली होती. त्यामुळे मतदारंनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला. आज सांयकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघात ६९ हजार ७८३ पुरुष, ७२ हजार १७५ महिला असे एकूण १ लाख ४१ हजार ९५८, (५२.६२ टक्के), रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ८० हजार ७०२ पुरुष, ८२ हजार २२४ महिला, इतर १ असे एकूण १ लाख ६२ हजार ९२७ (५७.४६ टक्के), राजापूर विधानसभा मतदारसंघात ५३ हजार ९७१ पुरुष, ५६ हजार ६०४ महिला असे एकूण १ लाख १० हजार ५७५ (४७.३१ टक्के), कणकवली विधानसभा मतदारसंघात ६४ हजार ७८९ पुरुष, ६० हजार ७८३ महिला असे एकूण १ लाख २५ हजार ५७२ (५५.१४ टक्के), कुडाळ विधानसभा मतदारसंघात ६७ हजार ६३३ पुरुष, ६१ हजार ८१७ महिला असे एकूण १ लाख २९ हजार ४५० (६०.९६ टक्के), सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ७१ हजार ८६७ पुरुष, ६५ हजार २१३ महिला असे एकूण १ लाख ३७ हजार ८० (६१.०७ टक्के).
या मतदारसंघातील एकूण १४ लाख ५१ हजार ६३० मतदारांपैकी ८ लाख ७ हजार ५६२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क सायंकाळी ५ वाजेपर्यंत बजावला. ही एकूण टक्केवारी ५५.६३ आहे. अंतिम आकडेवारी रात्री उशीरापर्यंत येण्याची शक्यता असून, ६४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २०१९ च्या लोकसभा मतदानाची टक्केवारी ६१.९९ टक्के इतकी होती. त्या तुलनेत निश्चितच यावेळी मतदानात चांगली वाढ झाल्याचा अंदाज आहे.
या लोकसभा मतदारसंघात आज सांयकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण १ बीयु, १ सीयु आणि १६ व्हीव्हीपॅट बदलाव्या लागल्या. यात चिपळूणमध्ये व्हीव्हीपॅट ३, रत्नागिरीमध्ये १ व्हीव्हीपॅट, राजापूरमध्ये बीयु १, सीयु १, व्हीव्हीपॅट २, कणकवलीमध्ये ५ व्हीव्हीपॅट , कुडाळमध्ये ३ व्हीव्हीपॅट, सावंतवाडीमध्ये २ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले.



