राणे-राऊत यांचे भवितव्य मतपेटीत बंद : ४ जूनला निकाल

रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात एकूण ९ उमेदवार रिंगणात होते; मात्र मुख्य लढत महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात होती. त्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले असून, मतदारांचा कौल ४ जूनला उघड होणार आहे.
मंगळवारी सकाळी पहिल्या दोन तासात मतदानासाठी मतदारांचा थोडा संथ प्रतिसाद मिळाला. मात्र त्यानंतर मतदार राजाने मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. सायंकाळी चार वाजल्या नंतर तर अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी पाच वाजता जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ५५ टक्के मतदान झाले. अखेरच्या एका तासात ही आकडेवारी वाढून सरासरी ६४ टक्क्यांपर्यंत पोहचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांना संधी देण्यात आली आहे. महायुतीकडून भाजपने या मतदार संघातून विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नऊ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत ही विद्यमान खासदार विनायक राऊत विरुद्ध महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यातच रंगणार असल्याचे चित्र आहे. या मतदार संघात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे हा संघर्ष पाहायला मिळाला. प्रचाराच्या काळात दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. जाहीर सभा, स्टार प्रचारकानी या मतदारसंघात हजेरी लावली. मात्र, राणे विरुद्ध राऊत लढतीमुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली.
सकाळी ९ वाजेपर्यंत ८.१७ टक्केच मतदान झाले होते. ९ नंतर मतदानाचा टक्का वाढला. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत १३.७२ टक्के, दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.७३ टक्के, तर दुपारी ३ ते ५ केवळ ९ टक्के मतदान झाले. सायंकाळनंतर मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागल्या होत्या़. रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी सरासरी ६४ टक्के मतदान झाले असून ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.



