निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांची बंदोबस्ताची तयारी

रत्नागिरी : राज्यात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून, राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने बंदोबस्त योजना तयार करण्यात आली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध ठिकाणी कारवाया करण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १२० पोलीस अधिकारी, २ हजार ८ पोलीस अंमलदार , तर १ हजार ६९२ होम गार्डची नियुक्ती करण्यात आली असून, सीपीआरएफची (सेन्ट्रल आर्म्ड फोर्सेस) १ तुकडी, तर एसआरपीएफच्या (स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स) २ तुकड्या नेमण्यात आल्या आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यंत दारूबंदीच्या १५० केसेस केल्या असून, १७ लाख ९५ हजार ७९३ रुपये किंमतीची ४२ हजार लिटर दारू, तर २ लाख ७ हजार ९७० रुपये किंमतीचे २४.२९४ ग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आर्म अॅक्टअंतर्गत ४ कारवाया केल्या असून, त्यातून ५ लाख १८ हजार ६०० रुपये किंमतीच्या ५ बंदुका आणि १६ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहेत. गुटख्याच्या २ कारवाया झाल्या असून, ४ लाख २ हजार ९३३ रुपये किंमतीचे १ हजार १२१ पाऊच जप्त केले आहेत. सीआरपीसी १०७, १०९, ११०, १५१ व बीपी अॅक्टअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईच्या ८१३ केसेस केल्या आहेत. यातील ४२२ अंतरिम बॉन्ड घेतले असून, ३३५ फायनल बॉन्ड घेतले आहेत. ३५१ नॉन बेलेबल वॉरंट प्राप्त असून, यातील ३१६ वॉरंट बजावण्यात आले आहेत, तर ३५ शिल्लक आहेत.



