माझी म्हातारी जेवणासाठी थांबली असेल!
– अभिजित हेगशेट्ये
बॅ. नाथ पै यांच्या आकस्मित निधनाने राजापूर लोकसभा मतदारसंघातून १९७१ साली प्रा. मधु दंडवते प्रजा समाजवादी पक्षतर्फे लोकसभेला शिवरामराजे भोसले यांच्याविरोधात अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत फक्त ३ हजार १९४ मतांनी निवडून आले ते बॅ. नाथ पै यांचा प्रदीर्घ वैचारिक आणि स्नेहमय मानवतेचा वारसा त्यांना पुढे न्यायची जबाबदारी घेऊनच. पुढील पाच निवडणुका प्रा. दंडवते वाढत्या मताधिक्यायाने या मतदारसंघातून निवडून येत राहिले आणि त्यांच्या कार्यकाळात अशक्य आणि विज्ञान क्षेत्रातील एक चमत्कार म्हणून गणले गेलेले कोकण रेल्वेच्या स्वप्नांच्या पूर्ततेची अनोखी भेट त्यांनी कोकणला दिली. राजापूर मतदारसंघाने बॅ. नाथ पैं इतकेच कदाचित त्यापेक्षा थोडेफार अधिकच प्रेम दंडवते यांना दिले. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत ते केंद्रीय रेल्वेमंत्री, अर्थमंत्री या अत्यूच्च पदावर पोहोचले. देवीगौडा पंतप्रधान होताना तर प्रा. दंडवते यांचे नाव प्राधान्याने पंतप्रधान पदाच्या शर्यतीत गणले जात होते. या मतदारसंघाला प्रदीर्घ वैचारिक वारसा आणि केंद्रातील उच्च पदांचा सन्मान दंडवते यांच्या माध्यमातून मिळत राहिला. आपल्या रेल्वेमंत्री पदाच्या काळातील त्यांनी अत्यंत महत्त्वाचे घेतलेले निर्णय म्हणजे आपटा ते रोहा कोकण रेल्वे प्रकल्प कामाची सुरवात आणि दुसरा म्हणजे आरक्षणाचे संगणीकरण आणि रेल्वेतील दुय्यम क्लासचे उच्चाटन करताना फोमच्या गादीचे आरामदायी दुसऱ्या वर्गाचे बर्थ सर्वसामान्य प्रवाशांना उपलब्ध करत त्यांच्यासाठी सुरू केलेला आरामदायी प्रवास.
फिजिक्सचे प्राध्यापक असणारे दंडवते हे विविध विषयांतील गाढे अभ्यासक होते. लोकसभेतील त्यांची भाषणे ही अत्यंत अभ्यासपूर्ण आणि लालित्यपूर्ण भाषेत होत. त्यांची भाषणे ऐकणे हा लोकसभेतील विरोधी खासदारांसाठी चुकवू न शकणारे क्षण असे. संसदेच्या शून्य प्रहराचा अचूक वापर करत अनेक सार्वजनिक प्रश्न पटलावर आणण्यात त्यांचा हातखंडा होता. कोकण रेल्वे प्रकल्प कार्यान्वित करताना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. जागतिकीकरणाचा काळ सुरू झाला नव्हता. अशावेळी रेल्वे बाँडच्या माध्यमातून फंड उभारण्याच्या संकल्पनेने कोकण रेल्वे प्रकल्पाला आधार दिला. त्यावेळी प्रा. दंडवते यांनी संपूर्ण कोकणात गावां-गावांत, तालुक्याच्या ठिकाणी सभा घेऊन कोकण रेल्वे प्रकल्प हा आपल्या सर्वांगीण विकासाचा कसा मुख्य मार्ग आहे, हे पटवून देतानाच या प्रकल्पासाठी जागा देण्यासाठी सर्वसामान्य जनतेला तयार केले; तसेच प्रकल्पासाठी रेल्वे बॉंड खरेदी करून निधी उभारून देण्याचे आवाहन केले. कोकण रेल्वे ही जनसहभागाची मोठी चळवळ उभारली आणि तीही निरपेक्षपणे. त्यामुळेच जगातील दर्जेदार काम कोकण रेल्वे करू शकली आणि आज हीच कोकण रेल्वे कार्पोरेशन काश्मिरमधील अत्यंत अवघड असणारा रेल्वे प्रकल्प उभारत आहे. जगातील सर्वाधिक उंच आयफेल टॉवरपेक्षाही ३० मीटर उंच चिनाबचा लोखंडी आर्चचा रेल्वे पूल याच टीमने उभारला आहे. आज कोकण रेल्वेचे काम निघाले असते, तर आजचे राजकारणी त्या कामाच्या टेंडरवर तुटून पडले असते आणि अत्यंत सुमार, भ्रष्ट काम करत त्यांनी रेल्वे पुरती लुबाडली असती. मुंबई-गोवा महामार्गावरील गेले १५ वर्ष रखडलेले काम त्याचे उदाहरण आहे. राजकीय नेत्यांचे चारित्र्य आणि चरित्र हे संपूर्ण जनमानसावर आणि प्रशासनावर परिणाम करत असते त्याचे आदर्श उदाहरण म्हणजे राजापूर मतदारसंघ. येथे आर्थिक हितसंबंधांचा स्पर्षही नव्हता. पारदर्शक आणि निरपेक्ष सामाजिक कार्याचा आदर्श ही या मतदारसंघाची परंपरा आहे.
प्रा. दंडवते यांना अर्थमंत्रीपद जाहीर झाल्याची बातमी सांगण्यासाठी आले, त्यावेळी ते आपले कपडे धुवत होते. इतका त्यांचा साधेपणा आणि स्वावलंबन वृत्ती मातृमंदिर संस्थेत अनेकवेळा पहायला मिळाली. खासदार असो अथवा मंत्री प्रा. दंडवते कोकण दौऱ्यावर असताना रत्नागिरीत आबा वणजू यांच्या छाया हॉटेलमध्ये उतरत, तर देवरूखला मातृमंदिर संस्थेतील छोट्या रूममध्ये. अर्थमंत्री असताना देवरूख शिक्षण प्रसारक संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी ते विशेष अतिथी होते. कार्यक्रम झाल्यानंतर संस्था चालकांनी त्यांची जेवणाची व्यवस्था शाही पद्धतीने केली होती; मात्र दंडवते यांनी त्यांना नम्र नकार देत सांगितले, “माझी म्हातारी जेवणासाठी थांबली असेल” आणि दंडवते मातृमंदिर संस्थेत परतले. ते थेट साम्यकुलात आल्या आल्याच त्यांनी मावशींना सांगितले, “मला जेवायला वाढ.” मावशीही हसल्या, “अरे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला तू देशाचा अर्थमंत्री प्रमुख पाहुणा होतास, तुला त्यांनी जेवायला दिले नाही.” दंडवतेही तितक्याच मिश्किलपणे म्हणाले, “तू जेवलीस का? नाही ना? मला माहित होतं, मी येईपर्यंत तू जेवणार नाहीस. त्यांना मी तेच सांगितले, माझी म्हातारी तिकडे जेवणाचे ताट लावून माझी वाट पाहत असेल. तुझ्या हातच्या जेवणाची संधी मी देवरूखला आल्यावर सोडीन का?” किती प्रेम आणि किती विलक्षण आपुलकी….
देशातील अर्थमंत्री पदावर असणाऱ्या दंडवते यांना अवडंबर तर नाहीच, पण एक निसर्गदत्त साधेपणा हा नानांचा स्वभाव विशेष होता. मंत्रीपदाच्या सारे सोपस्कार आणि मानमरातब बाजूला ठेवत सर्वसामान्य माणसांसोबत थेट चटईवर बसणे, त्यांच्यासोबत संवाद करणे, त्यांचे प्रश्न समजवूनू घेणे, लोकसभेतील अत्यंत क्लिष्ट घटना त्यांना सोप्या शब्दांत समजावून सांगणे, हा जो अत्यंत साधेपणा होता तो या मतदारसंघाचा एक विशेष पैलू होता. बॅ. नाथ पै आणि प्रा. मधू दंडवते यांच्यानंतर समाजवादी चळवळीतील साधेपणा विरळ होत गेला आणि राजापूर लोकसभा मतदारसंघ आपली नैतिकता विसरत गेला. त्याची जागा राडेबाज, टर्रेबाज, दहशत आणि प्रसंगी रक्तपाताच्या आक्रस्ताळी संस्कृतीने घेतली. राजकीय नेत्यांच्या चारित्र्याबरोबरच त्या-त्या मतदारसंघाचे चारित्र्य असते, हे खरे आहे; मात्र ते टिकविण्याचे आणि प्रसंगी बदलण्याचे सामर्थ्य मतदारांच्या वैचारिक प्रगल्भतेत असते. राजापूर लोकसभा मतदारसंघातील ही वैचारिक प्रगल्भता पुन्हा नव्याने जुन्या स्मृतींना जागवणारी आहे हे निश्चित.


