रत्नागिरी तालुक्यात युवासेनेचे ‘बूथ तिथे निष्ठावंत यूथ’ अभियान
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी प्रचार यंत्रणेत सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली असून, आता रत्नागिरी युवासेनेने ही ‘बूथ तिथे निष्ठावंत यूथ’ या अभियानाने प्रचार यंत्रणा अधिक भक्कम करण्याचा निर्धार केला आहे. युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रत्येक पंचायत समिती गणात राबविण्यात येणार आहे.
युवासेनेची ताकद प्रत्येक जिल्हा परिषद गटात भक्कम असून, युवकांचे जाळे अधिक मजबूत करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याचे ठरविण्यात आले आहे. प्रसाद सावंत यांनी युवासेनेची कमान हातात घेतल्यानंतर युवकांना भक्कम आधार देत ते त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांना तालुक्यात युवकांचा मोठा जनाधार लाभला आहे. विरोधी पक्षातील युवकही त्यांच्या संपर्कात असतात ही सुद्धा एक जमेची बाजू आहे. या अभियानातून युवकांचे मोठे पाठबळ विनायक राऊत यांच्या पाठीशी उभे करण्याचा प्रसाद सावंत यांचा मानस आहे.



