खेडमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

रत्नागिरी : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने बोरज शिवफाटा (शेवरवाडी, ता. खेड) येथील दोघांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून १२ जिवंत काडतुसे आणि सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक असा एकूण ५३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
अनिल भिकू गुहागरकर (वय ५०) आणि राजेश गजानन साळवी (५३, दोघेही रा. बोरज शिवफाटा शेवरवाडी, ता. खेड) अशी त्यांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विनापरवाना बंदुका वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एके पथक तयार केले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड उपविभागात गुन्हे प्रतिबंध गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बोरज येथे ही कारवाई करण्यात आली.
अनिल गुहागरकर याच्याडून सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक व ८ जिवंत काडतुसे, तर राजेश साळवी याच्याकडे सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक व ४ जिवंत काडतुसे विना परवाना आढळली. दोघांकडून अनुक्रमे २७ हजार ५०० आणि २६ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्यावर भारतीय हत्यार कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर, सागर साळवी, योगेश नार्वेकर, पोलीस नाईक दत्ता कांबळे यांनी केली.



