मुख्य बातमीसाहित्य-कला

‘स्वरनिनाद’ आणि ‘रियाज’तर्फे विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा

रत्नागिरी : येथील स्वरनिनाद अ‍ॅकॅडमी आणि रियाज संगीत अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या तीन वर्षांत तबला विषयात विशारद पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला असून, या प्रसंगी ज्येष्ठ तबलावादक आणि लेखक गुरुवर्य पंडित आमोद दंडगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत शहरातील शेरेनाका येथील राणी लक्ष्मीबाई सभागृहात होईल.
(कै.) विनायकबुवा रानडे आणि (कै.) भालचंद्रबुवा रानडे यांनी रत्नागिरीतील पहिल्या संगीत विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयातून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी रत्नागिरीचे नाव उज्ज्वल केले आहे. या संगीत विद्यालयरूपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. वडील आणि काकांनी सुरू केलेली ही संगीत परंपरा रत्नागिरीत अखंडपणे सुरू ठेवण्याचे कार्य सध्या विजय रानडे करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या स्वरनिनाद अ‍ॅकॅडमीमध्ये गायन, हार्मोनियम, तबला, पखवाज आदी विषयांचे शास्त्रोक्त शिक्षण दिले जात आहे. सध्या २५० विद्यार्थी या विद्यालयात शिकत आहेत.
या संगीत विद्यालयात गेल्या तीन वर्षांत तबला विषयात विशारद पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा वरद जोशी, रुद्रांश लोवलेकर, पुष्कर सरपोतदार, संकेत पाडळकर, पार्थ खालगावकर आणि स्वरूप नेने या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. त्यांना रियाज संगीत अ‍ॅकॅडमीचे संचालक केदार लिंगायत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या बरोबरच श्रीरंग जोगळेकर यांचे हार्मोनियम सोलोवादन होणार असून, यासाठी त्यांना सारंग जोशी, पुष्कर सरपोतदार हे तबलासाथ करणार आहेत. त्यानंतर विशारद पदवीप्राप्त केलेल्या मुलांचे तबला सहवादन होणार असून, यासाठी त्यांना ज्येष्ठ ऑर्गनवादक विलास हर्षे हे लेहेरासाथ करणार आहेत. या वेळी स्वरनिनाद अ‍ॅकॅडमीचे संचालक विजय रानडे, ज्येष्ठ गायिका आणि गुरू सौ. समिता जोशी, ज्येष्ठ गायिका आणि गुरू सौ. विनय परब उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला जास्तीत जास्त रसिकप्रेक्षकांनी उपस्थित राहून मुलांना शुभाशिर्वाद द्यावेत, असे आवाहन ‘स्वरनिनाद’चे संचालक विजय रानडे आणि ‘रियाज’चे संचालक केदार लिंगायत यांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : शनिवार, २७ एप्रिल २०२४
वेळ : सायंकाळी ६ ते ८
स्थळ : राणी लक्ष्मीबाई सभागृह, शेरेनाका, रत्नागिरी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button