शेवटच्या दिवशी ७ नामनिर्देशन पत्रे दाखल
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आज शेवटच्या दिवशी ७ नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली आहेत. विनायक राऊत नावाचे दोन उमेदवार रिंगणात असून, यापैकी नामसाधर्म्याचा फायदा घेत एका उमेदवाराने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच ७ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी १९ एप्रिल हा उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी शेवटचा दिवस होता. या दिवशी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या ७ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. यामध्ये दोन विनायक भाऊराव राऊत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), नारायण तातू राणे (भाजप), सुरेश गोविंद शिंदे (सैनिक समाज पक्ष), विनायक लवू राऊत (अपक्ष), राजेंद्र लहू आयरे (बसपा), मारुती रामचंद्र जोशी (वंचित बहुजन आघाडी), अशोक गंगाराम पवार (बहुजन मुक्ती पार्टी) यांचा समावेश आहे.
आजअखेर ९ उमेदवारांची १३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. उद्या (२० एप्रिल) सकाळी ११ वाजता दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. सोमवार (२२ एप्रिल) दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.



