मळदेवाडीत उद्या श्रीराम नवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

संगमेश्वर : तालुक्यातील मौजे मळदेवाडी (पो. कळंबस्ते) येथील श्रीराम मंदिरात या वर्षी ४० वा श्रीराम जन्मोत्सव सोहळा चैत्र शुक्ल नवमीला (ता. १७ एप्रिल) होणार आहे. श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने गेली ३९ वर्षे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात असून, या ही वर्षी ट्रस्टतर्फे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या पहाटे ४ वाजता काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी रामरक्षा, भजन, प्रवचन व दुपारी १२ वाजता श्रीरामाचा जन्म, त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा, महाप्रसाद होईल. सायंकाळी ६:३० वाजता लहान मुले व महिलांसाठी कार्यक्रम होणार असून, त्यानंतर हरिपाठ, कीर्तन व रात्री बहुरंगी नमन होणार आहे. सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ट्रस्टतर्फे आयोजित विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने केले आहे.



