मुख्य बातमीसाहित्य-कला

मॉरिशसमधील मराठी बांधवांची लोककला आज रत्नागिरीत

रत्नागिरी : मॉरिशसमधील मराठी भाषिक बांधवांच्या दर्जेदार लोककलेची पर्वणी रत्नागिरीकरांना आज अनुभवता येणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) आणि श्री प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा विशेष कार्यक्रम १५ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ ते ७ यावेळेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात होणार आहे. यात मॉरिशस सरकारमान्य मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट संस्थेच्या विशेष लोककला सादर केल्या जाणार आहेत.
शेकडो वर्षांपूर्वी इंग्रजांनी आपल्यासोबत कामासाठी अनेक भारतीय वंशाच्या लोकांना नेले. मॉरिशस देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता त्या पिढीचे पुढील वंशज विविध क्षेत्रात कार्यरत झाले आहेत. मॉरिशसमध्ये कार्यरत असतानाही त्यांनी आपल्या पूर्वजांच्या मातृभाषा, संस्कृतीचा विसर न पडू देता अत्यंत सचोटीने मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती सातासमुद्रापार असलेल्या मॉरिशसमधील मराठी भाषिक बांधवांनी अत्यंत प्रामाणिकपणे जपली आहे. हा धागा पकडून या सर्व मॉरिशसवासीय मराठी भाषिक बांधवांच्या कलेची ओळख सर्व रत्नागिरीकराना व्हावी, यासाठी ‘कोमसाप’च्या अध्यक्षा नमिता कीर यांच्या पुढाकाराने आणि श्री प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने रत्नागिरीत मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती यांच्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे.
या वेळी बोलताना ‘कोमसाप’च्या अध्यक्षा नमिता कीर म्हणाल्या, ‘गेली अनेक वर्ष मॉरिशसमधील स्थाईक मराठी बांधवांनी मराठी भाषा-साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा व तो वर्धिष्णू करण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याची ओळख आपल्यासमोर या कार्यक्रमाच्या माध्यमातून येत आहे. आपण रत्नागिरीकरानी या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत करावे.’ हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद, श्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य प्रयत्न करत आहेत.

कार्यक्रमविषयी :
दिवस : सोमवार, १५ एप्रिल २०२४
वेळ : सायंकाळी ५ ते ७ वाजता
स्थळ : राधाबाई शेट्ये सभागृह, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button