एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात डॉ. आंबेडकर जयंती साजरी
रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे वाङमय मंडळ, इतिहास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग यांच्या वतीने महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३३वी जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, प्राचार्या डॉ. सौ. आशा जगदाळे, प्रा. पूजा मोहिते, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, हॉटेल मॅनेजमेंट विभागप्रमुख प्रा. ताराचंद ढोबळे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी अकरावी कला शाखेच्या विशाखा यादव आणि ग्रुप यांनी गीतगायन केले. सलोनी राजीवले, अक्षता हळकुंडे, रोहन कांबळे, राहिना ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून वाङमय मंडळातर्फे निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील प्रथम तीन क्रमांक विजेत्या अनुक्रमे आदिना तबरेज फणसकर, अक्षता शांताराम हळकुंडे, सलोनी प्रकाश राजीवले यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या वेळी बोलताना संस्थेच्या अध्यक्ष श्री. हेगशेट्ये यांनी डॉ. आंबेडकर यांचे ज्ञान केवळ दलितांच्या उद्धारापुरते मर्यादित नाही, तर रोजच्या दैनंदिन आयुष्यातही उपयोगी पडणारे असल्याचे सांगून जलसिंचनाची संकल्पना त्यांनी मांडल्याचे सांगितले. बाबासाहेबांवर दलितांचे कैवारी असा शिक्का लावला गेला आहे; मात्र त्यांनी देशातील सर्वच स्तरातील लोकांसाठी काम केले. सर्व घटकांना तसेच स्त्रियांना कसा न्याय मिळेल याचा बारकाईने अभ्यास केला, असे सांगतानाच डॉ. आंबेडकरांच्या कार्याचे अनेक किस्से कथन करून त्यातून त्यांच्या ज्ञानाची आणि त्यांच्या विचारक्षमतेची माहिती श्री. हेगशेट्ये यांनी दिली. तसेच डॉ. आंबेडकर चिकित्सक होते. त्यांचा हा गुण आपण घेतला पाहिजे कारण आज त्याची आपल्याला गरज आहे, असे नमूद केले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचा, ऐका आणि समजून घ्या, असे आवाहनही केले.

या वेळी प्राचार्या डॉ. जगदाळे यांनीही मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली. या प्रसंगी ‘एनएसएस’ विभागप्रमुख प्रा. सुशील साळवी यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. पूर्णिमा सरदेसाई यांनी प्रास्ताविक केले. अद्वैत शेट्ये (प्रथम वर्ष कला शाखा) याने सूत्रसंचालन केले. आदिना फणसकर (अकरावी वाणिज्य शाखा) हिने आभार मानले.



