मुख्य बातमी

शिमगोत्सवातील पूर्वापार वाद मिटवण्यात रत्नागिरी पोलिसांना यश

रत्नागिरी : शिमगोत्सव, मानपान आणि त्यावरून होणारे वाद हे चित्र कोकणात नेहमीच दिसते; मात्र हे मानपानाचे हे समीकरण बदलण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. मानपानावरून सुरू असलेल्या जिल्ह्यातील ३४ पैकी २८ गावांतील वाद जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या पुढाकाराने मिटविण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून शिमगोत्सवात पालखीवरून वेगवेगळ्या गटांत वाद आहेत. या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी जिल्हा व प्रभारी पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेडमधील ४, गुहागरमधील २, संगमेश्वरमधील २, राजापूरमधील ३, नाटेमधील ३, देवरूखमधील ३, लांजामधील ४ व चिपळूणमधील ३ गावांतील ग्रामस्थांची पोलीस ठाण्यात तसेच गावात वारंवार बैठका घेतल्या आणि त्यांच्याशी सुसंवाद साधून रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ३४ पैकी २८ गावांतील पूर्वापार चालत आलेला वाद सामोपचाराने मिटविण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. तसेच एकूण ६ गावांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४ प्रमाणे मनाई आदेश लागू केले आहेत.
शिमगोत्सव सामंजस्याने आणि सद्भावनेने साजरा केला जाईल आणि उत्सवादरम्यान संपूर्ण जिल्ह्यात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी पोलीस कटिबद्ध असून, सदैव दक्ष आणि सक्रिय राहतील. या प्रयत्नांमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलिसांना त्या त्या गावचे पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, तंटामुक्त समित्यांचे सहकार्य मिळत असून या सर्वांचे जिल्हा पोलीस अधीक्षककांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button