अशा लाल मातीतराजकीयलोकसभा २०२४

भैयाशेठचा नाद करायचा नाय!

(लोकसभा निवडणूक वातावरणाचा ज्वर आसमंतात भिनू लागलेला, हातखंबा येथील एका रेस्टॅारंटमध्ये अगदी सहजच जमलेली मैफल थेट राजकारणाच्या वैचारिक घुसळणीचा मंच झालेली बिपिन, बाबूशेठ आणि दादा या कोलाहलात चिंताक्रांत बसलेले)
बाबूशेठ : जाम टेन्शन आलं आहे, काही समजत नाही काय निर्णय होणार याचं, गेले दोन महिने मला झोप लागली नाही आणि आता दिवसेंदिवस टेन्शन वाढतंच आहे.
बिपिन : हो ना! मला शंका आहे या फडणवीस साहेबांनी आपला गेम तर वाजवला नसेल ना! च्यायला असं काही घोळात टाकून ठेवलं आहे, की काही बोलता ही येत नाही आणि हलता ही येत नाही.
दादा : तस काही नाही रे… इतकं टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. आपला साहेब जबरदस्त पॅावरफूल आहे. कोणत्या सोंगट्या कोणत्या पॅाकेटमध्ये टाकायच्या यात तो बाप माणूस आहे आणि फडणवीस साहेब आणि आपल्या साहेबाचा सॉलिड जमतं. शिवसेनेत असताना तर आपल्या साहेबाशिवाय त्यांचं पानच हलत नव्हतं. गुहाटीला जाण्याचा साहेबाचा निर्णय पण फडणवीसांनी जोर केला म्हणूनच आपल्या साहेबांनी घेतला. एक सांगतो…. अमितशेठ मुंबईत आले आणि सगळा लोचा झाला. त्यांनी ३४-३५ चा आकडा टाकला आणि सगळी गणितंच पलटली. त्यांच्या ‘चारशे पार’मध्ये साला आम्हाला हद्दपार केलांनी नाही म्हणजे झालं….ऽऽऽऽऽ
बाबूशेठ : काय साला अंदाज लागत नाही या भाजपवाल्यांचा हे खरं…. साहेब पण इतके शांत का असतील? त्यांनी एकच सांगितले आहे, काहीही बोलायचं नाही! असं का असेल…..
दादा : गेल्या २० वर्षांच्या राजकारणात मी साहेबांसोबत अगदी सावलीसारखा आहे, पण कधी अशी आफत नव्हती आली. हा काहीतरी वेगळाच चाणक्य कुटनितीचा गेम असेल का? अशी मला दाट शंका येवू लागली आहे.
बिपिन : दादा तुला अशी शंका यावी हे आश्चर्य आहे. तू तर साहेबांचे राजकारणातील सारे टप्पे आणि त्यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाच्या निर्णयांचा आणि त्याच्या परिणामांचा साक्षीदार आहेस.
दादा : हो ना! म्हणूनच तर अधिक चिंताग्रस्त झालो आहे. राष्ट्रवादीत असताना साहेबांवर मोठ्या साहेबांचा इतका जीव होता, प्रेम होतं, की त्यांनी अगदी तरुणपणातच सारे एैश्वर्य आणि वैभव आपल्या साहेबांना दिले. अर्थात आम्हीही त्याचे लाभार्थी झालो. भास्कररावांना प्रसंगी डावलून थेट पालकमंत्रीपद दिले. त्यावेळी मला आठवतंय कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटणार अशी एक आणीबाणीची परिस्थिती आली त्यावेळी मंत्रीपदी असणारे साहेब अखेरच्या क्षणी मातोश्रीवर गेले आणि त्यांनी थेट शिवबंधन बांधले. तेथे ही उद्धव साहेबांनी आपल्या साहेबांना मोठा सन्मान दिला. साहेबांच्या प्रत्येक शब्दाला मोठी किंमत दिली. शिवसेनेत बाहेरून आलेले असतानाही उद्धव साहेबांचा एक आदेश आला आणि रत्नागिरीतील शिवसैनिकांनी विरोधी पक्षातील आम्हाला गळाभेट दिली, मोठ्या मतांनी निवडून दिले. त्यानंतर मंत्रीपद आणि शिवसेनेत मोठ्या पदावर सन्मान… तेथून शिंदे यांच्या सोबत गेले अगदी अखेरच्या घटकेला या बंडखोरीत सामील झाले, तरी शिंदे सरकारने मोठं मानाचं पान दिलं थेट उद्योगमंत्री पद आणि इतका मोठा सन्मान की साहेबांच्या मुखातून शब्द निघावा आणि तो सरकारने झेलावा. आता अचानक यांना दिल्लीच्या लहरीवर ताटकळत ठेवणं हे काही वेगळे संकेत देत आहे.
बाबूशेठ : दादा मी शंभरटक्के तुमच्या मताशी सहमत आहे. रत्नागिरीच्या काँक्रिटीकरणापासून ते विठोबा, छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत करोडोचा निधी आणण्याची ताकद आजपर्यंत फक्त एकच आणि एकच, आपल्या साहेबांची. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या शब्दानंतर त्यांच्या शब्दांचा मान! त्यामुळे त्यांनी आपल्या बंधुराजांसाठी तिकीट मागावे कशाला, तर ते मागे लागून द्यायला पाहिजे. एव्हाना प्रचाराची रणधूमाळी उडाली पाहिजे होती आणि हे तर काहीच निर्णय घेत नाहीत. दिल्लीश्वर मुख्यमंत्री शिंदे साहेबांना काहीही बोलू देत नाहीत. ज्यांनी या दिल्लीला अख्खे महाराष्ट्र बंडखारी करत अर्पण केले. त्यांच्या मुलाला विद्यमान खासदाराला तिकीट मिळण्यासाठी आर्जवे करावी लागतात?
बिपिन : मी सांगतो भैयाशेठ निवडणुकीत धमाका उडवून देतील. त्यांची कार्यकर्त्यांची लॅाबी कसली स्ट्राँग आहे. कोकणातल्या प्रत्येक तालुक्यातील कॅान्ट्रॅक्टर हा भैयाशेठचा माणूस. माणसं बांधून ठेवण्यात भैयाशेठचा कोणी हात धरू शकत नाही. अगदी माझंच सांगतो आज जो मी काही आहे आणि माझे फॅार्चून हे सारं भैयाशेठचे देणं आहे. तुम्हाला सांगतो नुसतं तिकीट जाहीर झालं की गेला बाजार हजार कारची मिरवणूक रस्त्यावर उतरेल फॅार्म भरायला! त्या धडकीनंच राऊतांचा डिपॉसिट जाईल.
बाबूराव : बिपिन, हे मात्र खरं आहे आणि शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तर शेठच्या टाचेखालीच की. एक मत इकडचं तिकडं हलणार नाही. तुला सांगतो, परवा शेठच्या वाढदिवसाला चिपळूणपासून बांदा-दोडामार्गपर्यंत पाच हजार केक कापले गेले. गिनीज बुकमध्ये रेकॅार्ड होईल असे कोणी पत्रकार म्हणाले.
दादा : अरे बाबांनू या साऱ्या नंतरच्या गोष्टी, आता तिकीटाचा लोचा करून ठेवला आहे या अमितभाऊंनी त्याचं काय? फारच तरसवतायत! साहेब कसं सहन करतात समजत नाही. मला काही वेळा वाटतं या फडणवीसांच्या नादालाच नको लागायला होतं सायबांनी!
बिपिन : आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि इकडे माजी आमदार बाळ माने यांनी आग्रह करत नारायण राणे यांना पुढे केलं आहे. त्यांना साहेबांची कोकणावरची वाढती लोकप्रियता अस्वस्थ करतेय. त्या आमदार बच्च कडूंसारखं साहेबांनी पण यांना धुडकावून आवाज टाकायला पाहिजे होता!
बाबूराव : एकदम बरोबर, मला तसंच वाटतं! रोज उठून यांची मर्जी सांभाळा, त्या पेक्षा……
दादा : थोडं दमानं घ्या! राजकारणात अपमान पचवणं हे पहिले सूत्र आहे. पण भैयाशेठचं एक भारी आहे, कमळ हातात घेणार नाही म्हणजे नाही! भाजपमधून तर नाहीच नाही. लढलो तर धनुष्य बाणावरचं… वैचारिक भूमिकेशी तडजोड नाही!
बिपिन : (जोरदार गडगडाटी हसत… टाळी देत….) वैचारिक भूमिकेशी तडजोड नाही…. भैयाशेठचा नाद करायचा नाय!!!!!

-बाबूराव रोखठोके

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button