धनेश संवर्धनाविषयीचे मुद्दे सरकार दरबारी मांडण्याचा संमेलनात सूर
महारष्ट्रातील पहिले धनेशमित्र संमेलन देवरूख येथे उत्साहात

देवरूख : कोकणातील धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी त्यांच्या ढोल्यांचे संरक्षण आणि नोंदणी, अधिवासाचे पुनरुज्जीवन, खाद्यफळांच्या वृक्षांची लागवड, खाजगी जागेत धनेश पक्ष्यांच्या ढोल्यांचे संवर्धन आणि जनजागृती या पातळ्यांवर काम करणे आवश्यक असल्याचा उहापोह देवरुखमध्ये झालेल्या ‘धनेशमित्र संमेलना’त करण्यात आला. धनेश संवर्धनाविषयी संमेलनात नोंदवलेले प्रमुख मुद्दे सरकार दरबारी मांडण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कोकणात पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेले ‘धनेशमित्र निसर्ग मंडळ’ आणि देवरुख मधील ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या संकल्पनेतून हे संमेलन आयोजित केले होते. येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या एस. के. पाटील सभागृहात शनिवारी (ता. 23) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत महाराष्ट्रातील पहिले ‘धनेशमित्र संमेलन’ पार पडले. या संमेलनाला ‘नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन’ आणि ‘गोदरेज कन्झुमर प्रोडक्ट्स लिमिटेड’ यांनी साह्य केले. संमेलनावेळी देवरुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत, ज्येष्ठ वन्यजीव संशोधक भाऊ काटदरे, एएसपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, रत्नागिरीचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट, ‘नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन’चे वन्यजीव संशोधक डॉ.. रोहित नानिवडेकर आणि वनस्पती अभ्यासक डॉ.. अमित मिरगळ उपस्थित होते.
कोकणात ककणेर म्हणून ओळख असलेल्या या पक्ष्याच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहे. कोकणात केली जाणारी निसर्गाची पूजा हीच वन्यजीव संवर्धनाचा पाया आहे, असे प्रास्ताविक सदानंद भागवत यांनी केले. ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे यांनी संमेलनाच्या पहिल्या सत्रात कोकणातील धनेश पक्ष्यांच्या नोंदीविषयी माहिती दिली. सीसीटीव्ही कॅमेरा लावून देवरुखमध्ये धनेश पक्ष्यांच्या प्रजनन क्रिया कशा पद्धतीने नोदवल्या जात आहेत, याविषयी त्यांनी माहिती दिली.
डॉ. रोहित नानिवडेकर यांनी खुल्या स्वरूपाच्या चर्चासत्रामधून स्थानिकांना कोकणात धनेश पक्ष्यांच्या संवर्धनामध्ये असलेल्या आव्हानांविषयी बोलते केले. या वेळी स्थानिकांनी धनेशाला असलेल्या धोक्यांची यादी तयार केली. हवामान बदलामुळे घरट्यांवर होणारा प्रभाव तपासण्यासाठी वर्षांनुवर्षांच्या नोंदी आणि मोठ्या संख्येने धनेशाच्या घरट्यांचे निरीक्षण नोंदवणे आवश्यक आहे. हे निरीक्षण ‘सिटीझन सायन्स प्रोग्राम’अंतर्गत करता येऊ शकते, असे मत नानिवडेकर यांनी सत्राअंती मांडले. या सत्रानंतर ‘महाएमटीबी’ आणि ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’ निर्मित महाधनेश पक्ष्यावरील माहितीपटाचे सादरीकरण झाले. यावेळी अक्षय मांडवकर यांनी संवाद साधला. धनेश पक्ष्यांना असणाऱ्या धोक्यांवर मात करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत, यावर खुल्या स्वरुपातील चर्चा सत्र पार पडले. कमी वेगाने वाढणाऱ्या झाडांचे ‘इन-सिटू’ पद्धतीने संवर्धन करुन, वेगाने वाढणाऱ्या प्रजाती या धनेशाच्या अधिवास संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये वापरणे आवश्यक असल्याचे मत वनस्पती अभ्यासक डाॅ. अमित मिरगळ यांनी सांगितले.
धनेश पक्ष्यांच्या अधिवासाच्या पुनरुज्जीवनाविषयी नानिवडेकर यांनी प्रमुख मुद्दे मांडले. धनेशाच्या संवर्धनाच्या कामात येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे स्थानिक झाडांच्या रोपांची उपलब्धता. मोठ्या संख्येने स्थानिक झाडांची रोपे तयार करणाऱ्या रोपवाटिकांना प्रोत्साहन देणे, हे धनेशाच्या अधिवास संवर्धनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे नानिवडेकर यांनी सांगितले. सृष्टीज्ञान संस्था, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ, सह्याद्री निसर्ग मित्र – चिपळूण, एन व्ही इको फार्म गोवा, महाराष्ट्र वन विभाग, निसर्ग सोबती – रत्नागिरी यांच्या सहकार्याने हे संमेलन पार पडले.
दरम्यान, कोकणात धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा संमेलनामध्ये धनेशमित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. देवळे गावातील धनेशमित्र भरत चव्हाण, डॉ. अमित मिरगळ, राजापूरचे धनेशमित्र धनंजय मराठे, निसर्गाची राजदूत तनुजा माईन आणि पर्यावरण पत्रकार अक्षय मांडवकर यांचा ‘धनेशमित्र’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच कोंसुब, आंगवली, देवळे, देवडे, किरबेट, धामणी या ग्रामपंचायतींनी देखील धनेशाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याने त्यांचा देखील सन्मान करण्यात आला.



