सुट्टयांच्या दिवशीही दुय्यम निबंधक व सहदुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

रत्नागिरी : ‘मार्च अखेरीस येणाऱ्या शनिवार (ता. २३), रविवार (ता. २४) त्याचप्रमाणे दि. २९, ३० व ३१ मार्च २०२४ या सुट्टयांच्या दिवशी देखील जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक व सह दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणी करण्यासाठी सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी विभागाने घेतला आहे. जनतेने याचा लाभ घ्यावा आणि आपल्या दस्तांची नोंदणी मुद्रांक शुल्क भरून करावी,’ असे आवाहन जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी सूर्यकांत घार्गे यांनी केले आहे.
मार्चअखेरीस येणाऱ्या सुट्यांच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक व सह दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसा आदेश नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे हिरालाल सोनावणे यांनी १९ मार्च रोजी पारित केला आहे. दरवर्षी मार्चअखेरीस आर्थिक वर्ष संपत असल्याने जनतेकडून स्थावर मिळकतीचे व्यवहार पूर्ण करून, मुद्रांक शुल्क भरून खरेदी दस्तांची नोंदणी मोठ्या प्रमाणात केली जात असते. त्याचप्रमाणे या वर्षीदेखील १ एप्रिलपासून स्थावर मिळकतीच्या रेडिरेकनरच्या दरात वाढ होणार असल्यामुळे मार्च २०२४ अखेरीस मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदणी होण्याची अपेक्षा नोंदणी विभाग व्यक्त करीत आहे.



