दानशूर भागोजीशेठ कीर आणि संत गाडगेबाबांचा पुतळा लवकरच : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : ‘दानशूर भागोजीशेठ कीर आणि संत गाडगेबाबांचा पुतळा उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून आर्थिक तरतूद केली आहे. येत्या सहा महिन्यांत हे पुतळे उभारले जातील आणि १५ ऑगस्टला लोकार्पण होईल, त्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल,’ अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना पालकमंत्री श्री .सामंत यांच्या हस्ते आज अत्यावश्यक संच, सुरक्षासंच व गृहपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला सिंधुरत्न समृध्द योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, माजी नगरसेवक निमेष नायर, बिपीन बंदरकर उपस्थित होते. शासन तुमची, तुमच्या कुटुंबाची काळजी घेत आहे. शासनाने तरुण, महिला, ज्येष्ठ, कामगार, शेतकरी सर्वांसाठीच विविध योजना आणल्या आहेत. या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, ‘कामगारांनी आपली नोंदणी करावी; तसेच त्याचे नुतनीकरण ही करावे. जेणेकरून २१ योजनांचा लाभ मिळेल. शासनाने केलेल्या योजनांमध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ज्या, ज्या घटना घडतात, त्यामध्ये न्याय दिला जातो. शासन या सर्व योजना आपल्यासाठी करतेय. आपल्यापर्यंत पोहोचवत असते. त्या सर्व योजनांचा लाभ घ्या. कामगारांनी सक्रीय नोंदणी करावी. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, अर्थिक योजनेत सहभागी व्हावे. विश्वकर्मा योजनेचाही लाभ घ्यावा. लेक लाडकी, सामाजिक सुरक्षा, महात्मा फुले जन आरोग्य या योजनांचाही लाभ घ्यावा.’
या वेळी संजितापवार, कृष्णा चव्हाण पाल्याला अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी ६० हजारांचा तसेच कामगाराच्या मृत्यू पश्चात तेजस्वी सुर्वे वारसाला २ लाखांचा धनादेश देण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त संदेश आयरे यांनी केले. सरकारी कामगार अधिकारी राजेश जाधव यांनी आभार मानले.



