रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवतीचा शिमगोत्सव उद्यापासून

रत्नागिरी : शहाराजवळील रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवतीचा शिमगोत्सव १४ मार्च ते ९ एप्रिल या कालावधीत साजरा होणार आहे. १४ मार्चला पाग पंचमी तर १५ मार्चला षष्टी उत्सव साजरा केला जाणार आहे.
शिमगोत्सवाची सविस्तर रूपरेषा अशी : १५ मार्च (षष्ठी उत्सव) दुपारी १:३० वाजता देवी भगवती मंदिरातून निघेल. तिथून भागेश्वर मंदिरमार्गे राम मंदिरमार्गे भैरव मंदिर येथे भावाची हातभेट घेण्यासाठी जाईल. तिथून मुरलीधर मंदिरमार्गे, काँग्रेस भवनमार्गे जोगेश्वरी मंदिर येथे जाईल. तिथून झाडगाव नाकामार्गे, गाडीतळ मार्गे, नवलाई पावणाई मंदिर येथे जाईल. तिथून पोलीस स्टेशन येथे महापुरुषाला भेट देऊन गार्हाणे घालून, परत धनजी नाका मार्गे, काँग्रेस भवन, भैरव मंदिर, राम मंदिर, भागेश्वर मंदिरमार्गे भगवती मंदिर येथे येईल. २४ मार्चला होळी आणण्यासाठी श्री देवी भगवती दुपारी १:३० वाजता मंदिरातून निघेल. तिथून भागेश्वर मंदिर मार्गे, राम मंदिर, स्नॅक कॉनर, मुरुगवाडा, भोळेवाडीमार्गे मिऱ्याबंदर येथील अनुराधा राजन सुर्वे यांच्या घरी कोंडी येथे जाईल. तिथून होळी ३ वाजता तोडून भोळेवाडीमार्गे, झाडगाव नाका, टिळक आळी, कॉँग्रेस भवन, मुरलीधर मंदिर, भैरव मंदिरमार्गे सहा वाजता पेठकर यांच्या ताब्यात देण्यात येईल. तिथून ८ वाजता हनुमान वाडी यांच्या ताब्यात देण्यात येईल. तिथून भागेश्वर मंदिर नंतर हनुमान पार येथे १० वाजता येईल. ११ वाजता भगवती मंदिर येथे आल्यानंतर १२ वाजता देवीचा होळीचा होम लावण्यात येईल.
सोमवारी २५ मार्चला धुळीवदंन उत्सव साजरा केला जाईल. त्यासाठी देवी दुपारी २.३० वाजता मंदिरातून निघेल. तिथून चव्हाटा देव, होळदेव, खंडोबा, वेताळ, गणपती, मारुती, या सर्व देवांवर धुळवड उडवेल. त्यानंतर मानकरी सावंत यांच्या घरातील देवावर, मंदिरातील देवावर, हनुमान पार येथील मारुतीवर, पुरातन गणेश मंदिरावर धुळवड उडवेल. त्यानंतर भागेश्वर मंदिरमार्गे, राम मंदिरमार्गे, भैरी मंदिर येथे जाईल. तिथून गुजर यांच्या, त्यानंतर काँग्रेस भवनमार्गे टिळक आळी येथे खेर यांच्या घरी जाईल. तिथून झाडगाव येथे सावंत यांच्या घरी जाईल. त्यानंतर जोगेश्वरी मंदिरमार्गे परत भगवती मंदिर येथे येईल.
मंगळवारी ३० मार्चला रंगपंचमी उत्सव साजरा केला जाईल. सायंकाळी ५ वाजता प्रथम श्री देवी भगवतीच्या अंगावर रंग उडवून त्यानंतर देवी रंग खेळायला मंदिरातून निघेल. तेथून चव्हाटा होळदेव, खंडोबा, वेताळ, गणपती, मारुती या देवांवर रंग उडवेल. तिथून मुख्य मानकरी यांच्या घरातील देवावर रंग उडवेल. तिथून त्यांच्या मंदिरातील देवावर रंग उडवेल. तिथून आधी हनुमान पार येथील मारुती देवावर आणि मग पुरातन गणपती मंदिर येथे रंग उडवेल. त्यानंतर परत श्री देवी भगवती मंदिरात येईल आणि रात्री १२ वाजता देवीचा आराबा तटबंदीवर प्रदक्षिणा घातली जाईल व प्रत्येक मानकराला मानाचे नारळ प्रसाद वाटप करण्यात येईल.
गुढीपाडवा उत्सव ९ एप्रिलला साजरा करून उत्सवाची सांगता केली जाईल. सकाळी ७ वाजता गुढी उभारून पूजा केल्यानंतर रात्री १२ वाजता निशान काठी उतरविली जाईल. त्यानंतर देवीच रूप उतरवून आणि भगवती देवीला गाऱ्हाणे शिमगोत्सवाची सांगता होईल.



