रत्नागिरीकरांनी लुटली आकाशदर्शन आणि जलविहाराची मज्जा

रत्नागिरी : शहराजवळील कर्ले येथील संजीव लिमये, जयेश पाथरे (रत्नागिरी) सहयोगाने आणि खगोलशास्त्र अभ्यासक प्रा. बाबासाहेब सुतार यांच्या सहकार्याने भाट्ये खाडीत ‘आकाशदर्शन आणि जलविहार’ असा कार्यक्रम नुकताच झाला. प्रारंभी जुवे गावाजवळ असलेल्या बेटावर रातथाऱ्यासाठी खारफुटीच्या झाडांवर बसलेल्या ब्राह्मणी घारी पाहून उपस्थितांना अनपेक्षित आनंद मिळाला.
परिचयाचा कार्यक्रम झाल्यानंतर श्री. सुतार यांनी आकाशातील तारे, नक्षत्र आणि त्यांच्याशी निगडित कथा/आख्यायिका सांगितल्या. प्रथम शर्मिष्ठा व सप्तर्षी यावरून ध्रुवतारा कसा ओळखाल, दिशा निश्चिती, राशी व नक्षत्रे कशी व कुठे पाहायची याची मनोरंजक माहिती दिली. तसेच विविध संस्कृतीमधील खगोलविषयक गोष्टी सांगून उपस्थितांची उत्सुकता वाढवली. मृग तारकासमूह नक्षत्र, व्याधाची चांदणी, मिथुन राशी, त्यात दडलेली पुनर्वसु, आर्द्रा तसेच पूर्व क्षितिजावर उगवलेली भव्य सिंह राशी व मघा, फाल्गुनीचे तारे पाहून मंडळी आश्चर्यचकित झाली. दरम्यान, जुवे गावातील सर्वांत जुने असलेल्या दत्त मंदिरात दर्शन झाल्यावर दुर्बिणीच्या सहाय्याने गुरू आणि त्याचे तीन उपग्रह छान दिसले. सर्वांनी प्रथमच दुर्बीणीतून हे मनोहरी दर्शन घेतले.
या जलविहार आणि आकाशदर्शन उपक्रमाला लहान मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योजक व हौशी मंडळी अशा उत्साही संमिश्र गटाचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर होडीवरच जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली.




