नारळ, मसाला पिकांतून अर्थार्जनाची चांगली संधी : डॉ. किरण मालशे

रत्नागिरी : ‘महाराष्ट्राच्या एकूण ४२ टक्के क्षेत्रावर नारळाची लागवड केली जाते. त्यातील २८ टक्के क्षेत्र हे केवळ कोकणात आहे. नारळ आणि मसाला पिकांतून अर्थार्जनाची चांगली संधी आहे. यात रोजगारही निर्माण होऊ शकतो; मात्र त्यासाठी कुशल मनुष्यबळही इथल्या मातीतच निर्माण होणे गरजेचे आहे,’ असे मत भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कृषी विद्यावेत्ता (प्रभारी अधिकारी) डॉ. किरण मालशे यांनी मांडले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयातर्फे (मुंबई) आयोजित ‘वार्तालाप’ माध्यम कार्यशाळा २९ फेब्रुवारीला शासकीय विश्राम गृहासमोरील हॉटेल सिल्व्हर स्वान येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘नारळातून चांगले उत्पन्न मिळते. मात्र कुशल मनुष्यबळ अल्प स्वरूपात आहे. याकडे कोण गांभीर्याने बघत नाही. त्यासाठी कौशल्यमनुष्यबळ निर्माण करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने नारळ संशोधन केंद्रामार्फत कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित केले जातात. यात नारळावर चढणी, काढणी याचे प्रशिक्षण दिले जाते. ‘फ्रेंड्स ऑफ कोकोनट ट्री’ तयार करण्याचे काम सुरू असून हे नारळ मित्र प्रशिक्षण घेणाऱ्यांची डिरेक्टरी तयार केली जाईल. जेणेकरून त्या त्या भागातील मागणीनुसार जवळपास असणारे नारळ मित्र नारळावर चढणी, काढणीचे काम करतील. सुपारी प्रक्रिया उद्योगातही चांगला वाव आहे. मात्र नारळाप्रमाणेच इथेही कुशल मनुष्यबळाची समस्या दिसून येते. मसाला पिके ही कोकणची ओळख आहे. मात्र उत्पादित मसाले थेट न वापरता त्यावर प्रक्रिया केली जाते. त्याची माहिती आणि प्रशिक्षणाची माहितीही संशोधन केंद्रात दिली जाते. त्याचप्रमाणे प्रक्रिया उद्योगांना कसे प्रोत्साहन दिले जाईल या अनुषंगानेही प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. एकात्मिक फलोद्यान विकास कार्यक्रमाच्या माध्यमातूनही काम केले जाते.’
या वेळी नारळ मित्र प्रशिक्षण घेणाऱ्या प्रियंका नागवेकर आणि शांभवी नागवेकर यांनी स्वत:चे अनुभव कथन केले.

तत्पूर्वी आयोजित कोकण रेल्वेतर्फे राबविल्या जाणाऱ्या ‘एक स्टेशन एक उत्पादन’ या विषयावर कोकण रेल्वेचे सहायक यातायात प्रबंधक वेदांत कौशिक यांनी माहिती दिली. २५ मार्च २०२२ पासून ही योजना सुरू केली असून, यात स्थानिक उत्पादकांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी कोकण रेलवव रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ या स्टेशनवर १५ दिवसांसाठी स्टॉल लावण्याची संधी स्थानिक उत्पादकांना मिळते. रोटेशन पद्धतीने चालणाऱ्या या योजनेत आतापर्यंत या तिन्ही ठिकाणच्या मिळून एकूण १०० हून अधिक लाभार्थीनी लाभ घेतला आहे. यात रत्नागिरीतील ३३, कुडाळमधील ३४, तर कणकवलीतील ३० लाभार्थीचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मालगुंड येथील प्राचीन कोकणचे वैभव सरदेसाई यांनी या योजनेमार्फत लाकडी खेळणी विकण्यासाठी गेल्या वर्षभरात ८ ते १० वेळ स्टॉल लावण्याची संधी मिळाली असून यामुळे आपले नाव भारतभर पसरण्यास मदत झाल्याचे सांगितले. जान्हवी भुरवणे या लभार्थीनीही त्यांना आलेला अनुभव कथन केला.
यानंतर जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन कार्यक्रमविषयी जिल्हा परिषदेचे अधिकारी कुमार शिंदे यांनी प्रेसेंटेशनद्वारे माहिती दिली. या वेळी इंदवटीचे (लांजा) सरपंच विनोद गुरव उपस्थित होते.



