बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर रत्नागिरी कार्यालयाची अंतर्गत रचना (फर्निचर) करण्यासाठी काही मर्जीतील लोकांना काम देऊन सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यांनी कामे पूर्ण करून घेतलेली आहेत, असा आरोप माजी नगराध्यक्ष मिलींद किर यांनी केला असून अशी कामे करून घेणार्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
ही कामे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाली असून ती निविदा सूचना उघडण्यापूर्वी देण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे. बांधकाम विभागाच्या अशिर्वादाने निविदा उघडण्यापूर्वीच मर्जीतील ठेकेदाराला काम देऊन काम करून घेतली जात आहेत. कायद्याची पायमल्ली करून सर्व प्रक्रिया बाजूला ठेवून आपल्या अधिकारात असे काम करून घेतलेल्या या सर्वांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही होण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडे दाखल करण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे.



