एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गझलकार देविदास पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. आशा जगदाळे, एनएनएस विभागप्रमुख प्रा. सुशील साळवी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, मराठी विभागप्रमुख प्रा. सचिन टेकाळे, प्रा. सचिन गिजबिले यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकाच भाषेत अनेक प्रकारचा लहेजा वापरून बोलण्याची पद्धत आपल्या मराठीत असल्याचे सांगून आजकाल पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढलेला दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या वाटचालीत सुरेश भट यांचा मोठा वाटा असल्याचे नमूद करत मराठी गझल हा आजही लोकांना न कळलेला विषय असल्याचे ते म्हणाले. या वेळी त्यांनी मराठी आणि हिंदी गझल ऐकवल्या. प्रा. टेकाळे यांनी ग्रामीण बोली गोडवा निर्माण करणारी असल्याचे सांगत मराठी भाषेची महती सांगितली आणि विविध प्रांतात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषा, त्याचा लहेजा, बोलीभाषेचे महत्त्व याचा सविस्तर आढावा घेतला. प्रा. शिंदे यांनी मराठी भाषेला आजही अभिजाततेचा दर्जा मिळाला नाही ही खंत व्यक्त केली. तसेच मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मराठी बोलूया, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून संहिल कीर, ऋतिक चव्हाण, स्नेहल सूर्यराव तसेच नंदिनी लिंगायत, ऋतुजा नाटलकर, शंकर आदिमुनी, सोनाली देवरूखर, साक्षी रसाळ या विद्यार्थ्यांना अनुक्रमे काव्यलेखन आणि निबंध स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रा. गिजबिले यांनी प्रास्ताविक केले. प्रा. टेकाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुकुमार शिंदे यांनी आभार मानले.



