मुख्य बातमीराजकीयशैक्षणिक

‘यिन’च्या मंत्रिमंडळात ‘नवनिर्माण’च्या अमृत गोरेची वर्णी

क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपदाची जबाबदारी

अमृत गोरे याचे अभिनंदन करताना नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये. शेजारी प्रा. सुकुमार शिंदे, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, प्रा. पूजा मोहिते.

रत्नागिरी : यंग इन्सपिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीत येथील नवनिर्माण महाविद्यालायतील विद्यार्थी अमृत अंकुश गोरे याची राज्यस्तरीय ‘यिन’ शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळात वर्णी लागली असून, त्याच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही निवडणूक लेखी परीक्षा, व्यक्तिमत्व विकास व मुलाखत अशा तीन टप्प्यांत झाली. ‘यिन’चे जिल्हा प्रतिनिधि प्रसाद गायकवाड यांनी या निवडणूक प्रक्रियेची पाहणी केली.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत या हेतूने सकाळ माध्यम समूहाच्या वतीने ‘यिन’ची स्थापना करण्यात आली आहे. ‘यिन’तर्फे दरवर्षी निवडणूक घेतली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या निवडणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्षांना राज्यस्तरीय ‘यिन’ कॅबिनेटमध्ये मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळते. जिल्हास्तरीय निवड झाल्यानंतर मुंबईमध्ये राज्यस्तरीय ‘यिन’ मंत्रिमंडळाची निवडणूक प्रक्रिया झाली. यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असे दोन गट तयार करण्यात आले. सत्ता स्थापन करून मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. त्यानंतर मंत्रिमंडळातील पदांचे वाटप करण्यात आले. अमृत गोरे याला जिल्हा आणि आता राज्यस्तरावर मंत्रिमंडळाचे कामकाज कसे चालते याचा अनुभव घेता येणार आहे.
अमृत गोरे याची ‘यिन’च्या मंत्रिमंडळात क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपद मिळाल्याबद्दल त्याचे नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी विशेष कौतुक केले. या वेळी प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, प्रा. पूजा मोहिते, प्रा. सुकुमार शिंदे उपस्थित होते. ‘यिन’च्या माध्यमातून राज्यस्तरीय युवा विधानसभेत जाण्याची मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधावी आणि आपली भविष्यातील वाटचाल करावी, अशा शुभेच्छा या वेळी चेअरमन श्री. हेगशेट्ये यांनी दिल्या. अमृत गोरे याच्या निवडीबद्दल त्याचे संस्थाध्यक्ष श्री. हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, प्राचार्या डॉ. जगदाळे, प्रा. शिंदे यांच्यासह इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button