भाजपच वारंवार का जिंकतो ? ✒️अजित कवटकर

‘शतप्रतिशत भाजप’ प्रत्यक्षात येण्यास आणखी किती निवडणुका लागतील या प्रश्नाच्या उत्तरातील कालावधीवर मतमतांतरे असू शकतात, मात्र प्रश्नच चुकीचा आहे असे मात्र बंगालच्या निकालानंतर कोणीही म्हणणार नाही.
मतदाराने भाजपला निवडताना विकासाला मत दिले, असे कथन चिकटवण्याचा भाजपने कितीही प्रयत्न केला तरी, त्यांनी अद्याप असाधारण असा कोणताही विकास केलेला नाही, हे स्पष्ट आहे. दरडोई उत्पन्न, रुपयाचे अवमूल्यन, मानवी विकास निर्देशांक, मानवी आनंद निर्देशांक वगैरे आकडेवारीत भारताचे स्थान पाहिले तर सत्य समोर येते. म्हणूनच भाजप जगाशी नव्हे तर आपल्याच देशातील आधीच्या सरकारांशी तुलना करत असतो. आजची जीडीपी वृद्धी, ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी वगैरे तर उत्क्रांती प्रक्रियेत साधलेला नैसर्गिक विकास आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाची एवढी प्रगती होणे अपरिहार्यच. मुद्दा असा की, विकासाला समाजवादी स्वरूप लाभले आहे की एका ठरावीक स्तरावरील गटाचीच उन्नती झाली? एखाद्या गटाचा विकास म्हणजेच देशाचा विकास हे देशवासीयांच्या गळी उतरविण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. थोडक्यात विकासाच्या मृगजळापलीकडे अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे भाजपच्या विजयाचा अश्वमेध रोखणे कुणाला शक्य होत नाही. उदाहरणादाखल महाराष्ट्राचा संदर्भ घेणे समर्पक ठरेल.
एखाद्या राज्याच्या राजकीय आखाड्यात उतरण्यापूर्वी भाजप त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक संघटनांच्या माध्यमातून भावनेला साद घालणारे कार्यक्रम घेऊन त्या राज्यात हातपाय पसरतो. यातून संघटनेचा प्रसार तर होतोच पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकारणविरहित सामाजिक कार्याकडे आकृष्ट होणारा सुशिक्षित व प्रभावी वर्ग त्यांच्या संलग्न संस्थांना म्हणजेच त्यांना लाभतो. संघ शाखांमध्ये कधी भाजपचा उच्चारही केला जात नाही, मात्र स्वयंसेवकांवर असे काही संस्कार होतात की त्यांना कधी एखादी राजकीय भूमिका घेणे भाग पडले, तर ते भाजपचीच री ओढताना दिसतात. सेवा कार्यातून केल्या जाणार्या ‘ब्रेन वॉशिंग’चा हा एक सर्जनशील पण निरुपद्रवी प्रकार म्हणा. त्यांचे हे संघटन कौशल्य नक्कीच स्तुत्य आहे आणि जर विरोधकांना हे जमत नसेल तर ते त्यांचे दुर्भाग्य. भाजप आणि आरएसएसने नेहमी एकमेकांपासून कायम जाणीवपूर्वक अलिप्त राहून आपल्या अस्तित्वातील वेगळेपण कायम राखले आहे. धर्मवाद – राष्ट्रवादाचा समतोल साधण्यासाठी ते एकमेकांच्या पारड्यात वजन टाकत असतात. एकाने मतदार तयार करायचे आणि दुसर्याने ते पदरात पाडून राज्य करायचे. यात काही चुकीचे नाही. संलग्न संस्थांना दिली जाणारी स्वायत्तता आणि त्यांच्यामधील समन्वय व समजूतदारपणा हा इतका निर्दोष, परिपूर्ण आहे की त्याचे अनुकरण इतर राजकीय पक्षांना करता येणे शक्य दिसत नाही. भाजपच्या विजयात हाच घटक विशेष परिणामकारक ठरत असतो. शिवसेनेच्याही अनन्यसाधारण प्रसारामागचे प्रमुख कारण गल्लोगल्लीत शाखा हेच होते. जोपर्यंत या शाखा सर्वसामान्यांच्या नसांवर बोट ठेवून होत्या तोपर्यंत शिवसेनेचा भगवा हा नवी उंची गाठत राहिला. महाराष्ट्रात आपला पाय भक्कमपणे रोवण्यासाठी भाजपने म्हणूनच सुरुवातीला शिवसेनेशी युती केली.
भाजपच्या धुरंधर राजकारणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य हे की ते सुरुवातीला कमीपणा घेत मुंगी बनून साखर खाण्याचे तंत्र अवलंबवतात आणि कालांतराने सर्वच गिळंकृत करत आपले मोठे उद्दिष्ट साध्य करतात. त्यासाठी लागणारी चिकाटी, संयम, शिस्त आज त्यांच्याकडेच असल्याकारणाने हे त्यांनाच जमू शकते. राजकारणात निर्णायक विजयासाठी अहंकार तात्पुरता बाजूला सारून पक्षवाढीसाठी कटू निर्णय घ्यावे लागतात. भाजपने आपली सांस्कृतिक ओळख झुगारून सर्वांना आपल्या पक्षात ओढले. ज्यांची हयात भाजपचा द्वेष करण्यात गेली त्यांची संख्या त्यात अधिक आहे. हे आज आलेले कालच्यांहून अधिक निष्ठावान असल्याचे सिद्ध करण्यासाठी मेहनत करताना दिसतात. यात फायदा झाला भाजपचाच. दुसरीकडे परिवारवादी प्रादेशिक पक्ष मात्र नेतृत्वाला पुढे आव्हान होऊ नये अशी संकुचित बुद्धी ठेवून नकारात्मक राजकारण करत बसले, फसले. हे पक्ष आज केवळ सत्तेसाठी आतुर दिसतात आणि त्याच वेळी भाजप निरंतर संघटन बांधणीवर सर्वाधिक कष्ट घेताना दिसतो. त्यासाठी त्यांनी नि:स्वार्थ प्रसारक, प्रचारक, कार्यकर्ते आणि भक्तांचीही मजबूत फळी उभारली आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा पक्ष असणारी शिवसेना अशीच आक्रमक, समर्पित होती. आज मात्र सगळीकडे नेत्यांचे पक्ष बघायला मिळतात. याचेच परिणाम महाराष्ट्राच्या सद्य राजकीय परिस्थितीत दिसतात.
भाजपची विचारसरणी किती धर्मवादी आणि राष्ट्रवादी आहे हे ते स्वत: चांगले जाणतात परंतु ती व्यापक आणि बहुसंख्य समावेशक आहे, यात मात्र वाद नाही. यातील एक उल्लेखनीय बाब म्हणजे, ते त्यांच्या विचारसरणीवरदेखील इतकी एकाधिकारशाही निर्माण करतात की आज हिंदुत्व म्हणजे भाजप हे समीकरण प्रस्थापित झाले आहे. इतर कोण हिंदुत्वाचा, राष्ट्रवादाचा पुरस्कार करत नाही, असे नाही परंतु भाजप एवढे रान उठवतो की मग इतरांना स्वत:साठी काही शिल्लक उरेल की नाही असा प्रश्न पडतो आणि मग ते पक्ष पर्यायी मुद्दे शोधून विचारधारेशी जोडू लागतात. पण यात होते असे की नवीन मुद्दे आणि मूळ मुद्द्यांत संघर्ष निर्माण होतो. त्यांची विचारधाराच मलीन होते आणि ती तशी व्हावी याची पुरेपूर काळजी भाजपचा मीडिया-सेल घेतो. भाजपने आपल्या विचारधारेतील मुद्द्यांवर मक्तेदारी प्रस्थापित केली की मग ते त्यात कमालीची लवचीकता आणून, सत्तेसाठी आश्चर्यकारक राजकीय प्रयोग करू लागतात. हे इतरांनी केले असते तर ती वैचारिक मूल्यांशी प्रतारणा असल्याचे चित्र निर्माण केले गेले असते.
भाजपचे एक कमालीचे वैशिष्ट्य म्हणजे ते विरोधकांच्या ज्या कृत्यांवर आरोप करताना दिसतात, तीच कृत्यं कालांतराने ते स्वत: करताना दिसतात. शिवसेना काँग्रेस – राष्ट्रवादीबरोबर गेली, तेव्हा शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची दवंडी भाजपने देशभर पिटली, परंतु आज तोच राष्ट्रवादी पक्ष भाजपबरोबर युतीत आहे आणि काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत. हा पॅटर्न देशभर दिसतो. इतरांची तडजोड तो राजकीय व्यभिचार आणि स्वत:ची तडजोड मात्र राष्ट्रहितासाठी असल्याचे भासवले जाते. यात भाजपचा हात कोणीही धरू शकत नाही.
पक्ष फोडणे, आमदार पळविणे, निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडणे, मतदार विकत घेणे, ‘वोट कटवा’ राजकारणाला प्रोत्साहन देणे, माध्यमांना ‘मॅनेज’ करणे, स्वायत्त संस्थांना नियंत्रणात ठेवणे, असांविधानिक मार्ग स्वीकारून न्याय प्रलंबित ठेवणे वगैरे सारे काही आज भाजप सत्ता प्राप्तीसाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी करत आहे. याच साम- दाम- दंड- भेद नीतीतून सत्ता मिळते आणि टिकते असे जर निवडणुकांतून पुन्हा पुन्हा अधोरेखित होत असेल तर मग असे न करणारा पक्ष आज राजकारणात सापडेल का? आता इच्छित साध्य करण्यासाठी लागणारा अफाट पैसा भ्रष्टाचारातूनच उपसावा लागत असणार. पण हे कोणताही पक्ष मान्य करणार नाही, मात्र त्यासाठी इतरांकडे बोट मात्र दाखवणार. परिवारवादामुळे आज पक्षांतर्गत लोकशाही गटाराप्रमाणे तुंबली आहे. आज ग्रामपंचायत निवडणुकीतही घराणेशाहीशिवाय पान हलत नाही, नेतृत्वाची तर बातच सोडा. पक्ष हे सध्या ‘फॅमिली एंटरप्रायझेस’ झाले आहेत. भाजपमध्येदेखील राज्यपातळीवर तेच आहे, परंतु सर्वोच्च पदांवर मात्र त्यांनी या वृत्तीचा अद्याप तरी शिरकाव होऊ दिलेला नाही.
भाजप धुतल्या तांदळाचा नसला तरी, विरोधकांमध्ये काहीच विधायक, सकारात्मक उरले नसल्याची भावना लोकांमध्ये रूढ होत चालली आहे. ही भावना भाजपला लाभ मिळवून देताना दिसते. परंतु असे होणे हे लोकशाहीसाठी फार घातक होय. चीन, रशिया, उत्तर कोरियासारख्या देशांसारखी लोकशाही भारतात प्रस्थापित करणे तर भाजपला अभिप्रेत नाही ना, अशी भीती त्यांच्या एकंदर निरंकुश कार्यपद्धतीवरून वाटू लागली आहे. प्रादेशिक पक्ष गुंडाळून ठेवले जात आहेत. कोणत्याही प्रदेशाची प्रादेशिक अस्मिता, वैशिष्ट्ये टिकवणे – स्वाभिमान जपणे आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रादेशिक पक्ष निर्णायक ताकदीचे असणे गरजेचे आहे. नव्हे तर मुंबईसारख्या उच्चभ्रू शहरांतून तेथील भूमिपुत्रालाच बाहेर फेकले जाते, तशी स्थिती सर्वत्र दिसू लागेल. हे रोखण्यासाठी समविचारी प्रादेशिक पक्षांनी विश्वास – सामंजस्याने एकत्र येणे आवश्यक आहे. परंतु तेदेखील त्यांना जमत- झेपत नसल्याचे दिसते. मग अशा परिस्थितीत भाजपला कोणीच रोखू शकणार नाही. आज विरोधी पक्ष नाही तर विरोधी पक्षांच्या केवळ बाता उरल्या आहेत. त्यांना अधूनमधून गाजर दाखवले की हे मनोरंजनदेखील काही काळासाठी दुर्लभ होते, असे मतदारांना वाटू लागले आहे. भाजपचे लाख दुर्गुण असतील परंतु एक पक्ष – संघटना म्हणून त्यांची राजकीय रणनीती, शिस्तबद्ध कार्यप्रणाली, नियोजनबद्ध दूरदृष्टी याला तोड नाही.
शेवटी सगळे विजयाचेच गुणगाण गाताना दिसतात. तो कसा प्राप्त झाला याचा कोणी विचार करत नाही आणि केला तरी लक्षात ठेवत नाही. लोकांच्या याच ‘शॉर्ट मेमरी’चा ‘लेट गो ॲटिट्युड’ आजच्या घृणास्पद राजकारणाला कारणीभूत आहे. तमिळनाडूच्या निकालांनी दाखवून दिले की लोक आजही नवविचारांकडे, आश्वासक पर्यायांकडे आकर्षित होऊन, त्यांवर विश्वास टाकून, संधी देण्याच्या मन:स्थितीत आहेत. आज भाजप जिंकतो आहे म्हणण्यापेक्षा विरोधी पक्ष स्वत:ला पराजित करण्यासाठी आवश्यक ते सर्वकाही करत आहेत, असे म्हणणे अधिक योग्य होईल. याचा अर्थ असा नाही की इतरांनीदेखील जिंकणार्याच्या चुकीच्या गोष्टींचे अनुकरण करून अराजक माजवावे. पण, जिंकणार्याची अवैध पद्धती, लबाडी, खोटेपणा जसा लक्षपूर्वक पाहिला जातो, तसेच त्याचे विजयाला कारणीभूत ठरणारे गुणही अभ्यासून ते आत्मसात करण्याची, प्रगल्भताही दाखवली गेली पाहिजे. हे करण्यासाठी जो कष्ट घेणार नाही, त्याग करणार नाही तो राजकारणात सतत हरताना आणि भाजप जिंकतानाच दिसणार.



