स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला ब्ल्यूरीबीन पुरस्कार प्रदान
बँको आणि अविज पब्लिकेशनतर्फे ८ वर्षे सन्मान

रत्नागिरी : बँको आणि अविज पब्लिकेशनतर्फे प्रतिवर्षी बँको ब्ल्यूरीबन पुरस्कार प्रदान करण्यात येतात. ३०० कोटींपर्यंतच्या ठेव विभागातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आज (१७ मे) रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला प्रदान करण्यात आला. २०२३ सालसाठीचा हा पुरस्कार बँकोचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे-गुंडाळे यांनी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या रत्नागिरी कार्यालयात प्रत्यक्ष येऊन ॲड. दीपक पटवर्धन यांना ब्ल्यूरीबिन २०२३ ची ट्रॉफी प्रदान केली.
स्वरूपानंद पतसंस्थेला सातत्याने ८ वर्षे बँकोचा पुरस्कार प्राप्त होत आहे. विश्वासार्ह अर्थकारण, अचूक रेकॉर्ड-किपिंग, तंत्रज्ञानाचा वापर करत स्वामी स्वरूपानंद पतसंस्था सातत्याने आपले अर्थकारण करीत आहे. संस्थेची संबंधित असलेल्या सभासदांची संख्या आता ४५ हजार पार गेली आहे. १७ ब्रांचच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करणारी पतसंस्था म्हणून स्वामी स्वरूपानंद संस्थेची ओळख आहे. राज्य फेडरेशनचा दीपस्तंभ, राज्य शासनाचा मानाचा सहकार भूषण तसेच केंद्र शासनाच्या अंगीकृत राष्ट्रीय सहकारिता निगमचा २०२३च्या गुणवत्ता पुरस्काराने स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला गौरवण्यात आले आहे.
बँकोचा ब्ल्युरीबन पुरस्कार स्विकारताना खूप आनंद होतो. हा पुरस्कार नवचेतना जागवणारा पुरस्कार आहे. ३५० कोटी ठेवींचा ठेव टप्पा खुणावत असताना प्राप्त झालेला हा पुरस्कार संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.



