गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर ‘रो-रो’ सेवेतून कार वाहतूक होणार !

रत्नागिरी : – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांची आणि पर्यटकांची सर्वात मोठी चिंता म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेली कामे, वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा थकवा. पण आता कोकण रेल्वेने यावर एक जबरदस्त उपाय शोधला आहे. ’रो-रो’ सेवेच्या यशस्वी प्रयोगानंतर, आता प्रथमच प्रवाशांसाठी ’कार ऑन ट्रेन’ ही अभिनव सेवा सुरू केली जात आहे. यामुळे आता तुम्ही स्वतः प्रवास करताना तुमची लाडकी कार थेट रेल्वेने कोकणात किंवा गोव्यात घेऊन जाऊ शकणार आहात.
कोकण रेल्वेच्या या घोषणेमुळे हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेली अनेक वर्षे मालाने भरलेले ट्रक रेल्वे वॅगनवरून वाहून नेणारी ’रो-रो’ सेवा यशस्वी ठरली आहे. याच धर्तीवर आता खासगी चारचाकी वाहनांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास कार चालवण्याच्या त्रासाशिवाय अधिक आरामदायी, सुरक्षित आणि आनंददायी होणार आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या गर्दीत हा पर्याय अत्यंत सोयीचा ठरणार आहे.
ही सेवा येत्या 23 ऑगस्टपासून सुरू होणार असून, यासाठीचे आरक्षण 21 जुलै 2025 पासून खुले होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव चाकरमान्यांसाठी खर्या अर्थाने ’चिंतामुक्त’ प्रवासाचा अनुभव देणारा ठरेल.
प्रत्येक कारसाठी शुल्क 7 हजार 875 रुपये कारसोबत तिघांना एसी कोच अगर एसएलआर डब्यातून प्रवास करता येणार
बुकिंग सुरू: 21 जुलै 2025.
-बुकिंगची अंतिम तारीख: 13 ऑगस्ट 2025.
– कोलाड (महाराष्ट्र) येथून: 23 ऑगस्ट 2025 पासून.
– वेर्णा (गोवा) येथून: 24 ऑगस्ट 2025 पासून.
– ही सेवा 11 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहील.
या सेवेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांपासून सुटका.
– प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत.
– लांबच्या प्रवासात गाडी चालवण्याचा शारीरिक आणि मानसिक त्रास वाचणार.
– कोकणात किंवा गोव्यात फिरण्यासाठी स्वतःची गाडी उपलब्ध.
ही सेवा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान उपलब्ध असेल. या सेवेची सुरुवात कोलाड (महाराष्ट्र) येथून 23 ऑगस्ट 2025 पासून तर वेर्णा (गोवा) येथून 24 ऑगस्ट 2025 पासून होणार आहे.



