महाराष्ट्र राज्यमहिला जगतमुख्य बातमी

एनडीएतून पहिली महिला अधिकाऱ्यांची बॅच  देशाच्या सेवेसाठी सज्ज !

पुणे : पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) आज (३० मे) दीक्षान्त संचलन (पासिंग आउट परेड) पार पडले आहे. हे दीक्षान्त संचलन ऐतिहासिक ठरले आहे. कारण यावेळी १४८ व्या तुकडीचं संचलन हे ‘एनडीए’मधील महिला छात्रांनी केलं असून महिला छात्रांची पहिली तुकडी यंदा उत्तीर्ण झाली आहे. यावेळी माजी लष्करप्रमुख तथा मिझोरामचे राज्यपाल व्ही.के.सिंग यांच्याकडून या संचलनाची पाहणी करण्यात आली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने २०२१ मध्ये दिलेल्या निर्णयानंतर महिलांना ‘एनडीए’मध्ये प्रवेश देण्यास सुरुवात झाली. त्यानुसार २०२२ मध्ये ‘एनडीए’साठीच्या प्रवेश प्रक्रियेत पात्र ठरलेल्या महिला छात्रांना ‘एनडीए’मध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर जवळपास तीन वर्षांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या महिला छात्रांची पहिली तुकडी आता उत्तीर्ण झाली असून देशाच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.

‘एनडीए’चा पदवी प्रदान सोहळा पार पडला असून जनरल (नि.) व्ही.के.सिंग हे दीक्षान्त संचलनाला ‘पासिंग आउट परेड’ला उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या छात्रांना पदक प्रदान करण्यात आले. तसेच यावेळी व्ही.के.सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीतील महिला छात्रांना मार्गदर्शन देखील केलं.

पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) १४८ व्या तुकडीमध्ये महिला छात्रांनी तीन वर्षांचं खडतर प्रशिक्षण घेतलं आहे. या तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षण काळात या रणरागिणींनी अनेक अडथळ्यांचा सामना केला. यानंतर आता त्या पासआऊट झाल्या असून आता त्या देशाच्या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. या बरोबरच यावेळी ३०० पेक्षा जास्त पुरुष छात्र देखील एनडीएतून ग्रॅज्युएट होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button