निसर्गाच्या कुशितील,उबेतले एक शांत,निसर्गरम्य “तळेकांटे गाव”

✍️शरद कदम, मुंबई
मुंबईहून येताना संगमेश्वर बसस्थानक मागे पडतं आणि उजव्या बाजूला एक नदी आपली सोबत करायला लागते. ती नदी आहे ‘ बावनदी. ‘
बावनदी आणि सप्तलिंगी नदीच्या काठावर, डोंगरावर झाडीत लपलेलं, एक रम्य गाव आहे तळेकांटे, मुंबई–गोवा महामार्गावर असलेलं,पण तरीही गजबजाटापासून दूर, शांततेत न्हालेलं.
एक रस्ता निवळी घाट ओलांडत रत्नागिरीला जातो, तर दुसरा पांगरी मार्गे देवरूखला. या तिठ्ठ्याच्या थोडं अलिकडे डोंगराच्या दिशेने नागमोडी वळणांनी भरलेला रस्ता कशेडी घाटाची आठवण करून देत गावात घेऊन जातो. थंडीच्या दिवसात वर घाट चढताना आकाशातले ढग जणू स्वागत करतात. धुक्यात रस्ता दिसेनासा होतो. पावसाळ्यात तर रस्त्याच्या कडेने जाताना धबधब्यांची रांगच लागते. वर गावात पोहोचेपर्यंत मनातील सगळा थकवा कुठे विरघळतो ते कळतच नाही. घरात पाऊल टाकताच झऱ्याचं थंड, गोड पाणी त्याहीपेक्षा उरलेली मरगळ धुऊन टाकतं.
मोबाईलचे उंच टॉवर,ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हापरिषदेची शाळा, गावचं देऊळ ,रस्त्याच्या कडेने लावलेली काजू-आंब्यांची झाडं बघत मोकळ्या आकाशाचे दर्शन घेत आपण गावात येतो. मोबाईल टॉवर असला तरी सिग्नल मिळेल याची खात्री नाहीच. दिवसातून दोन-तीन वेळा वीज गेली तरी कुणाला तेवढं फार वाटत नाही. कारण, इथे येणारा माणूस मोबाईल, इंटरनेट, टीव्ही, AC यापासून सुटका शोधतच येतो. शरीरात ताजा ऑक्सिजन भरून घेण्यासाठी ‘ तळेकांटे ‘ इतकं योग्य ठिकाण दुसरं नाही.
हायवेला आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशनला जवळ असूनही इथे धूळ, प्रदूषण किंवा गोंगाट नाही. हिवाळ्यात थंडी इतकी की ब्लँकेट शिवाय झोप लागत नाही. आजूबाजूला जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट, माकडांची उडापड, कधीतरी येणारा बिबट्याचा थरार, मोर, लांडोर, ससा, रानडुकरे आदी अन्न साखळीतील प्राणी,निसर्गाचं सगळं रूप इथे अनुभवायला मिळतं.आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांपैकी फक्त तळेकांटे गावालाच जास्त वनराई आणि गर्द झाडीचे वरदान आहे आणि कडे कडेने वाहणाऱ्या बावनदी आणि सप्तलिंगी नद्या या तर जीवनरेखा.
गावात अंतरा अंतरावर वसलेल्या वाड्या गावाचे अस्तित्व जिवंत करतो. हल्ली एकंदरीतच शेती कमी झाल्यामुळे पुर्वी सारखा भात लावणी, भात कापणी असा शेतीचा उत्सवच राहिला नाही. पुर्वीसारखी गुरे म्हणजेच पशुधन पण आता जेमतेमच. तरीपण तुरळक प्रमाणात मोजकेच शेतकरी शेती करतात.
पावसाळ्यात तर इथला निसर्ग तर इतक्या छटा धारण करतो की त्याची मोजदाद करणं जवळजवळ अशक्यच आणि त्या प्रत्येक छटेमधील सौंदर्यात आपण फक्त स्वतःला हरवून द्यायचं आणि निसर्गाचाच एक भाग होऊन राहायचं हे एक स्वर्गसुखच म्हणावं लागेल. पावसाळ्यात पावसाची रिपरिप पुर्ण थांबली असताना वाराही पुर्ण पडलेला असताना सगळा निसर्गच जणू ध्यानस्थ झालाय याचा प्रत्यक्ष येऊनच अनुभव घ्यायला हवा. गणपती, होळी हे सण तर कोकणचं वैभवच. होळीला पालखी, नमन, सोंगे पाहण्यासाठी यायलाच हवं.
पावसाळ्यात महालक्ष्मी वाडी आणि बनेवाडीच्या गणपती विसर्जन घाटाजवळचा धबधबा अप्रतिम! गावठाणात ‘आठसोपी’ वरचा धबधबा आणि विहीर हे सुंदर पिकनिक स्पॉट आहेच. पण त्याचं मार्केटिंग करायला हवं.इथं पर्यटन व्यवसाय उभा राहू शकतो त्यामुळे तरुणांसाठी गावातच रोजगाराची संधीही निर्माण होऊ शकते. दिवसातून तीन चार एस.टी.बसेस रत्नागिरी हून देवरूखकडे आणि देवरुखहून रत्नागिरीला तळेकांटे गावातून जा – ये करतात. गावठाणात किराणा सामानाचे एक जुने दुकान ही आहे.
ज्यांना रिसॉर्ट आणि बंदिस्त हॉटेलमध्ये राहायचं नाही, ज्यांची सकाळ पक्षांच्या आवाजाने व्हावी,चुलीसमोर बसून आंघोळीचं पाणी तापेपर्यंत वाट पाहण्याचा अनुभव हवा आहे,पंजाबी,साऊथ पदार्था ऐवजी अस्सल कोकणी पद्धतीचे घावणे, कोंबडी वडे, कुळदाची पिठी, तांदळाची भाकरी खायची आहे. किंवा AC शिवाय पडवीत बसून सकाळचा चहा घ्यायचा आहे,त्यांच्यासाठी तळेकांटे म्हणजे सगळीकडे हवा असणारा पण फार कमी ठिकाणी मिळणारा निसर्गाचा साधा, शांत श्वास. गावात शिरल्यावर आपसुकच एक आपुलकीची भावना येते. हे गाव नसून हे एक कुटुंबच आहे.” आपलं घर ” आहे. इथली माती, पाणी, डोंगर, दऱ्या आपली वाट बघत असतात असा गावात शिरल्यावर फील येतो.
या गावात आणखी एक लपलेली किंवा दुर्लक्षित अशी एक जागा आहे. पाचगणीला गेल्यावर आपल्याला टेबल लँड पहावयास मिळतो. तशी ‘ सडा ‘ म्हणून असलेली ही जागा ‘टेबल लँड ‘ सारखी आहे.
ग्रामपंचायत ऑफिस असलेल्या समोरच्या डोंगरातून वर चालत गेलो की, सभोवती कातळ पसरलेला दिसतो, झोंबणारा गार वारा झेलत नुसती पायपीट केली तरी पाचगणीच्या टेबल लँड वर आल्याचा भास होतो.मोठे नैसर्गिक पठार आहे. सपाट, लालसर मातीचे हे मैदान जणू निसर्गाची विशाल रंगभूमीच! सूर्यास्ताच्या वेळी तर संपूर्ण भाग सोनेरी रंगात न्हाऊन निघतो.शांत भटकंती, फोटोशूट, आणि थंड गार वारा अनुभवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
बावनदी किंवा सप्तलिंगी नदीत निवांत डुंबता येतं, आणि नशिबानं जमलं तर नदीतला मळीचा ताजा मासाही मिळतो. गाव इतकं मध्यवर्ती की, इथं राहून 40 किमीच्या परिसरात गणपतीपुळे, भगवती किल्ला, रत्नागिरी काळा पांढरा समुद्र, थिबा पॅलेस, शिवसृष्टी,मार्लेश्वर, कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मृती स्थळ,पावस, जयगड सहज पाहता येतात.
हे सर्व पाहताना, मनात एखादी अशी ओळ नकळत उमटते……
डोंगराच्या कुशीत ये,
झाडांच्या सावलीत बस,
झऱ्याच्या,नदीच्या पाण्याशी गुजगोष्टी कर,
मनात साठव एक दिवस….
मोकळी हवा, मोकळा श्वास,
गावाचा हा सुगंध घेऊन परत जा शहरात,
शहरातला गजबजाट, वाहतूक कोंडी, गोंधळ, प्रदूषण आणि बंद फ्लॅट मधला वावर विसरून जगून बघ एक गावातला उनाड दिवस…..


