मुख्य बातमीशैक्षणिक

‘नवनिर्माण हाय’मध्ये ‘रोटरी’च्या इंटरॅक्ट क्लबची स्थापना

विद्यार्थी गिरवणार 'रोबोटिक्स'चे धडे; अमेरिकेतून मिळणार मार्गदर्शन

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण हाय इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन यांच्या वतीने इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. या क्लबचा इन्स्टॉलेशन प्रोग्राम नुकताच शाळेत पार पडला. या क्लबमधील मुलांना अमेरिकेत शिक्षण घेणारी आणि आंतरराष्ट्रीय ‘रोबोटिक्स’ स्पर्धेत बक्षीस मिळविणारी अद्विका निर्मल चौधरी ही नववीतील विद्यार्थिनी ‘रोबोटिक्स’चे धडे देणार आहे.
लहान वयात समाजसेवेची आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी या मुख्य हेतूने रोटरीच्या माध्यमातून शाळेत क्लबची स्थापना केली जाते. या क्लबमध्ये नवनिर्माण हायमधील ३० मुलांचा सहभाग असणार आहे. या क्लबचा प्रेसिडेंट म्हणून शर्विल रसाळ याची निवड करण्यात आली असून, तीर्था नाखरेकर सचिव, तर काव्या विलणकर ट्रेजरर म्हणून काम पाहणार आहेत. प्रा. केतनकुमार चौधरी हे या क्लबचे मार्गदर्शक असणार आहेत. नवनिर्माण हायमधील इंटरॅक्ट क्लबमध्ये सहभागी झालेल्या मुलांना क्लबच्या माध्यमातून ‘रोबोटिक्स’ या विषयात एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील आणि एक स्थानिक पातळीवरील असे दोन प्रोजेक्ट सादर करायचे आहेत. त्यासाठी या मुलांना १६ आठवडे प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यांना रोबोटिक्सच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊ शकतील अशा पद्धतीने तयार केले जाणार आहे.
यावेळी नवनिर्माण हायमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, मुख्याध्यापक अरविंद पाटील, रोटरीचे झोनल को-ऑर्डिनेटर समीर इंदुलकर, असिस्टेंट गव्हर्नर केतनकुमार चौधरी, प्रेसिडेंट बिपिनचंद्र गांधी, सेक्रेटरी डॉ. स्वप्ना खरे, ट्रेजरर जयेश दिवाणी, प्रेसिडेंट इलेक्ट हिराकांत साळवी, सेक्रेटरी इलेक्ट डॉ. संदीप खरे, श्रेया इंदुलकर, स्मृतिका पाटोळे, ऋचा गांधी, सुवर्णा चौधरी, रोटरॅक्ट क्लब प्रेसिडेंट आर्य आंबुलकर, व्यंकटेश पाटोळे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी विनय आंबुलकर, राजेंद्र कदम, पास्ट प्रेसिडेंट संजीव सुर्वे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते नवीन पदग्रहण केलेल्या विद्यार्थ्यांना मानाची पिन आणि कॉलर प्रदान करण्यात आली. यावेळी या विद्यार्थ्यांसह प्राचार्य डॉ. पाटील, श्री. व सौ. हेगशेट्ये, श्री. पाटोळे, श्री. गांधी, श्री. इंदुलकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. स्वप्ना खरे यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button