रत्नागिरी जिल्हा वृत्त

महामार्गावर सुरक्षेची योग्य काळजी ठेकेदार कंपनीने न घेतल्यास कठोर कारवाई – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. अशावेळी अपघात घडू नयेत याकरीता महामार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. महामार्गावर परावर्तक आणि चेतावणीदर्शक दिवे बसवण्यात यावेत अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ठेकेदार कंपनी आणि अन्य विभागांना केल्या आहेत.

अलिकडेच रायगड जिल्ह्यातील माणगाव रेपोली येथे ट्रक आणि कार या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला होता. तसा अपघात घडू नये याकरीता रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने तातडीची बैठक घेतली महामार्गावर सुरक्षेची योग्य काळजी ठेकेदार कंपनीने न घेतल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिला.

रेपोली येथे झालेल्या भीषण अपघातात दहाजणांचा मृत्यू झाला होता. या घटनेकडे गांभिर्याने पाहून रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे असा दुर्दैवी अपघात होऊ नये याकरीता खबरदारी घेण्याची गरज आहे. त्याकरीता जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी कार्यालयात एक महत्वपूर्ण तातडीची बैठक आयोजित केली.

या बैठकीमध्ये महामार्गावर योग्य व महत्वाच्या ठिकाणी फलक लावावा. एकेरी मार्ग, वळण, पुढे काम चालू आहे याची माहिती देण्यात यावी, दिशापरिवर्तकाचा योग्यवेळी वापर करणे, महामार्गावर योग्य ठिकाणी संकेतदर्शक बसवणे, महामार्गावर परावर्तक व चेतावणीदर्शक दिवे बसवण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या. या सूचनांचे पालन न झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिला आहे. महामार्गावरील सामग्री चोरीला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. चोरीला गेल्यास त्याचा लागलीच पाठपुरावा करण्यात यावा अशी सूचना त्यांनी मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button