मुख्य बातमीशैक्षणिक

मूळ विचारांची बैठक असेल, तर वक्तृत्व जीवन बदलते : ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव

एस. एम. जोशी विद्यानिकेतनमध्ये ४२व्या कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात

रत्नागिरी : वक्तृत्व म्हणजे पोपटपंची नाही, पाठांतर नाही, तर ही एक कला आहे. त्याला विचारांची जोड हवी. शब्दांचा अर्थ समजणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी वाचन हवे.. वाचा पण नक्कल करू नका. स्वतः चे मत मांडा. मूळ विचारांची बैठक असेल, तर वक्तृत्व जीवन बदलते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, लेखक ज्ञानेश महाराव यांनी केले.

येथील एस. एम. जोशी विद्यानिकेतनमध्ये ४२व्या कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन २३ व २४ ऑगस्ट रोजी केले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २४ ऑगस्ट रोजी श्री. महाराव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील, परीक्षक योगेश कदम, प्रा. प्रकाश पालांडे, डॉ. शंकर जाधव, गणपत शिर्के, प्रा. राजरत्न दवणे, सिद्धेश मिसाळ, स्पर्धा संयोजक प्रा. सचिन टेकाळे, अभिनेते मयुरेश कोतकर उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार श्री. महाराव म्हणाले, “हृदयातून येते ती भावना आणि मेंदूतून येते ती बुद्धी. आपल्या वक्तृत्वातून बुद्धीची चमक आणि भावनेचा ओलावा दिसला पाहिजे. वक्तृत्व हे श्रवणीय असले पाहिजे, सहजसुलभ असले पाहिजे, याचीही काळजी घेतली पाहिजे. कला माणसाला उन्नत करते, व्यापक करते म्हणूनच ती त्याप्रकारे विकसित करायला हवी. स्वतःला ओळखणे ही सुद्धा कलाच आहे आणि ती प्रसंगानुरूप येते. ते प्रसंग आयुष्यात आले पाहिजेत आणि आपण ते ओळखले पाहिजेत.

रत्नागिरी : बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये. शेजारी डावीकडून (पुढे) डॉ. अरविंद पाटील, ज्येष्ठ पत्रकार, लेखक ज्ञानेश महाराव, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, अभिनेते मयुरेश कोतकर.

संस्थेचे अध्यक्ष श्री. हेगशेट्ये यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या आजूबाजूला काय घडतंय ते पाहण्यासाठी संवेदना जाग्या असल्या पाहिजेत असे सांगतानाच वक्तृत्व प्रभावीपणे मांडण्यासाठी शब्दांचे सामर्थ्य, वापर समजला पाहिजे. ही स्पर्धा उद्याच्या महाराष्ट्राला एक ताकदीचा नेता देणार, असा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button