जिंदाल कंपनी वायुगळती प्रकरणी जयगड ग्रामस्थ अलर्ट मोडवर
१३ डिसेंबर रोजी जयगड ग्रामस्थांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन

रत्नागिरी : जिंदाल कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आज जयगड परिसरातील मुलांना वायुगळतीचा त्रास झाला. कंपनीच्या निष्काळजी कारभाराबद्दल जाब विचारण्यासाठी, तसेच भविष्यात अशा प्रकारचे संकट, समस्या उद्भवल्यास काय करावे संदर्भात उपाययोजना करण्यासाठी जयगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. ही बैठक उद्या (१३ डिसेंबर) सकाळी १० वाजता संदीप बाजीराव शिरधनकर यांच्या निवासस्थानी होणार आहे.
जिंदाल कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आज परिसरातील ६० बालके बाधित झाली. भविष्यात परिसरातील ग्रामस्थांवरही पत्ती ओढवू शकते. त्यातून सर्व बाधित होवू शकतात. कंपनीचे प्रशासन अत्यंत निष्काळजी असून, कुणबीवाडी भागातही वायुगळतीमुळे त्रास झाला आहे. याबाबत आणि इतर सर्व समस्यांबाबत उपाय योजना करण्यासाठी उद्या या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
विषयाचे गांभीर्य ओळखून या बैठकीला जयगड पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रमोद प्रभाकर घाटगे, जयवंत गजानन आडाव, संदीप बाजीराव शिरधनकर, अनिरूद्ध कमलाकर साळवी, मंदार श्रीकांत बारगोडे, स्वप्नील राजेंद्र रसाळ, सुयोग जयवंत बिवलकर, सौ. वैभवी वैभव घडशी यांनी केले आहे.



