मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तराजकीयशैक्षणिक

वाहन आयुष्य सुकर करण्याचे साधन असावे : खा. विनायक राऊत

'नवनिर्माण'मध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता

रत्नागिरी : “आज तुमच्यापैकी अनेकांच्या हातात दुचाकी असेल पुढे जाऊन चारचाकीही येईल; पण ही वाहनं आयुष्य संपवण्याचे नाही, तर आयुष्य सुकर करण्याचे साधन असावे. त्यादृष्टीने सुरक्षित चाला, अपघात टाळा हा संदेश तुम्हीही पाळा आणि इतरांनाही पाळायला सांगा, ” असे आवाहन खासदार तथा संसदीय रास्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष विनायक राऊत यांनी येथे केले.

उपप्रदेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा वाहतूक शाखा आणि एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय व नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने ३५ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ एस. एम. जोशी विद्यानिकेतनमधील सभागृहात झाला. त्यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर उपप्रदेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, जिल्हा वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस अधिकारी विजय जाधव, नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे उपस्थित होत्या.

खासदार राऊत म्हणाले की, “हे अभियान विद्यार्थ्यांना केवळ रस्ता सुरक्षेचेच नव्हे, तर जीवनाचे महत्त्व कळावे ह्यादृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे. कोकण म्हणजे नागमोडी वळणाचा प्रदेश आहे. दहा वर्षांपूर्वी कोकणात अपघात होण्याचे आणि त्यात मृत्यू पावण्याचे प्रमाण जास्त होते; मात्र उपप्रदेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी चोख बजावत अपघाताचे प्रमाण कमी करण्यात ९९ टक्के यशस्वी झाले आहेत, ही कौतुकाची बाब आहे.”

ते पुढे म्हणाले की, “नागरिकांसाठी चांगले आणि दर्जेदार रस्ते बनवणे ही काळाची गरज आहे आणि तो त्यांचा हक्कही आहे. शासन, प्रशासनाच्या माध्यमातून चांगले रस्ते निर्माणही केले जात आहेत; मात्र अशा रस्त्यांवर सुसाट गाडी चालवण्याचे प्रमाण वाढत आहे. पर्यायाने आपघातांचे प्रमाणही वाढत आहे. नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलीस उत्तमरीतीने करत असले तरी त्यांना योग्य सहकार्य करण्याचे काम आपले आहे आणि नवनिर्माण महाविद्यालयाच्या सीमा हेगशेट्ये आणि डॉ. आशा जगदाळे विद्यार्थ्यांना हे धडे देण्याचे काम करत आहेत याबद्दल आनंद वाटतो. २०२४ सालात रत्नागिरी जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. ”
जिल्हा वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस अधिकारी श्री. जाधव यांनी वाहतुकीचे जास्तीत जास्त नियम नगरिकांपर्यंत विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. तसेच प्राणांतिक अपघाताचे (फेटल अॅक्सिडेंट) प्रमाण जास्तीत जास्त कमी होतील यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.


या वेळी उपस्थित सर्वांनी रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा केली. पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव खासदार राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, एस. एम. जोशी विद्यानिकेतन परिसरात नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिरही घेण्यात आले. त्याला विद्यार्थ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सूत्रसंचालन प्रा. सचिन टेकाळे यांनी केले. तर आभार मंगेश गुरव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button