‘नवनिर्माण’ची शैक्षणिक वाटचाल उल्लेखनीय : उद्योगमंत्री उदय सामंत
'तंदुरी नाईट्स'ला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : “रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उपेक्षित वंचित हजारो मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या नवनिर्माण महाविद्यालयाची शैक्षणिक कार्याची वाटचाल अत्यंत उल्लेखनीय आणि वैशिष्ठ्यपूर्ण आहे. येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला खऱ्या अर्थाने कौशल्याधारीत शिक्षण आणि उच्च रोजगाराच्या संधी देण्याच्या अभूतपूर्व कार्याच्या माध्यमातून अभिजित हेगशेट्ये यांनी नवनिर्माण हा आदर्श शिक्षणाचा मानदंडच जिल्ह्याला दिला आहे”, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये हॅाटेल मॅनेजमेंट महाविद्यालयातर्फे तंदुरी नाईट्स थीम डीनर सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांच्यासह उपाध्यक्ष डॅा. अलिमियाँ परकार, जेष्ट उद्योजक बापू शेट्ये, उद्योगपती रामकृष्ण कोळवणकर, जेष्ट नगरसेवक राजन शेट्ये, सुदेश मयेकर, संचालिका सीमा हेगशेट्ये, माजी सभापती बाबू म्हाप आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनिर्माण संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीनिमित्ताने हॅाटेल मॅनेजमेंट विभागाने थीम डीनर या प्रत्यक्षिक प्रकारातील तंदुरी नाईट्स हा दोन दिवसांचा मेगा महोत्सव नुकताच आयोजित केला होता. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उद्योगमंत्री सामंत यांनी आपण गेल्या आठ थीम डीनर कार्यक्रमांपैकी चार कार्यक्रमांना उपस्थित राहत रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कौशल्याधारीत, व्यवसायाभिमुख शिक्षण देणाऱ्या आणि कोकणच्या पर्यटन उद्योगात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नवनिर्माण संस्थेच्या या शिक्षण चळवळीसोबत कायम जोडलेला असल्याचे अधोरेखीत केले. ‘कोकणच्या पर्यटन आणि औद्योगिक विकासातील एक महत्त्वाचा भाग ह्या महाविद्यालयातील विद्यार्थी घडवत आहेत. मला संधी मिळाली असती, तर मी याच महाविद्यालयात प्रवेश घेतला असता. इतर महाविद्यालयांपेक्षा ‘नवनिर्माण’ची ओळख ही खऱ्या अर्थाने विद्यार्थीभिमुख आणि नवनिर्माणाची आहे. आजचा हा भव्य सोहळा विद्यार्थ्यांच्या अद्भुत कौशल्यसाधनेची साक्ष आहे’, असे ते म्हणाले.

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या हॅाटेल मॅनेजमेंट विभागाने कोविडनंतर प्रथमच थीम डीनर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘नवनिर्माण’च्या भव्य प्रांगणात तंदुरी नाईट्सचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग होता. यात तंदूरी मुर्ग चाट, भाटी दा मुर्ग, मुर्ग आलीशान टिक्का, मुर्ग जहाँपनाह, मटन मुमताज अशा रुचकर पदार्थांची रेलचेल होती. भाज्या, फुले आणि फळांचा कार्वींग स्टॅाल आणि जगलींग स्टॅाल हे उपस्थितांचे विशेष आकर्षण होते. रत्नागिरीच्या खवैंयांसाठी तर हा विशेष महोत्सव ठरला. या दोन दिवसांत जवळपास पाच हजार खवैयांनी या महोत्सवाला भेट देत आनंद लुटला तसेच पुढीलवर्षी किमान चार दिवस हा महोत्सव ठेवा, अशी मागणी केली.

हॅाटेल मॅनेजमेंट विभागाने हा महोत्सव करताना अत्यंत उत्तम नियोजन केले होते. हे सारे नियोजन आयोजन हॅाटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी, प्राध्यापक ताराचंद ढोबळे, प्रा. शेफ मेघना शेलार, प्रा. सोनाली साठे यांच्यासह प्राचार्या आशा जगदाळे, प्रा. सुकुमार शिंदे, सचिन टेकाळे, सुशील साळवी आणि त्यांची एनएसएस टीम, नवनिर्माण महाविद्यालयाचा तसेच नवनिर्माण हायचा सर्व स्टाफ यांनी केले होते. संस्था चेअरमन अभिजित हेगशेट्ये आणि संचालिका सीमा हेगशेट्ये यांनी या संवयांचे आभार मानले आणि यापुढे महाविद्यालयाच्या दैदिप्यमान यशासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अशीच संघटन भावना ठेवून काम करण्याचे आवाहन केले.



