वेदमूर्ती सचिन भाटवडेकर यांचे रत्नागिरीत व्याख्यान

रत्नागिरी : येथील झाडगावमधील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले आहे. यात आवळेगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील वेदमूर्ती सचिन भाटवडेकर ‘आद्य शंकराचार्याचे स्तोत्रवाङ्गय’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. हा कार्यक्रम १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे.
भाटवडेकर यांचे शालेय शिक्षणानंतर पाठशाळेत संपूर्ण याज्ञिक आणि संस्कृत एमए, बीएड्. पर्यंत शिक्षण झाले आहे. श्रीमद् भागवत कथा, रामायण कथा या कथा सांगण्याचा त्यांचा व्यासंग आहे. आद्य शंकराचार्यानी वयाच्या आठव्या वर्षी सर्व वेदांचे ज्ञान प्राप्त केले होते. त्यांनी भारतभ्रमण करून चारही दिशांना चार पीठांची स्थापना केली. जे आजचे चारधाम आहेत. शंकराचार्यानी गोवर्धन पुरी मठ (जगन्नाथ पुरी), श्रृंगेरी पीठ (रामेश्वरम), शारदा मठ (द्वारिका) आणि ज्योतिर्मठ (बद्रिनाथ धाम) स्थापन केले होते. त्यांनी अनेक प्रकारची स्तोत्ररचनासुद्धा केली. त्यासंबंधी वेदमूर्ती सचिन भाटवडेकर व्याख्यान देणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य मंदार भिडे, सचिव जयराम आठल्ये आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले आहे.



