
– कोमल कुळकर्णी-कळंबटे
हल्ली मुलांचा स्क्रीनटाईम वाढला आहे, ही तक्रार प्रत्येक घरातून ऐकू येते. मग ते मूल बाळ असो किंवा अगदी १६ वर्षांचे सगळ्यांनाच मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, टॅब्लेट यांची सवय नव्हे तर व्यसनच जडले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत स्क्रीनवर असल्याने मुलांचे बाहेर पडणेही बंदच झाले आहे. मैदानी खेळ खेळणे, मित्र-मैत्रिणींशी गप्पागोष्टी करणे, लपाछपी खेळणे हे प्रकार हल्ली दिसेनासे होऊ लागले आहेत. पूर्वी उन्हाळी सुट्टी लागली की मुलांना वेध लागायचे ते मामाच्या गावाला जायचे. विशेषत: कोकणात येणाऱ्या भाचरांसाठी तर मामा अगदी महिनाभर आरामात निघून जाईल असे नियोजन करून ठेवायचा. नदीवर पोहणे, करवंद, जांभळं, तोरणं असा रानमेवा गोळा करायला जाणे, बैलगाडीतून रपेट, आंबा खाण्याची स्पर्धा एक ना अनेक उद्योग असायचे. माडाच्या झावळींचा मांडव घाललेल्या आणि शेणाने सारवलेल्या अंगणात बाजल्यावर, झोपाळ्यावर निवांत पडून राहण्यातही एक वेगळ्या प्रकारचे सुख होते. संध्याकाळच्या वेळेत गावात सहजच फेरफटका मारण्याची मज्जा सुद्धा औरच होती; मात्र आता मुलांना टीव्ही, मोबाईल बंद करून बाहेर खेळायला जा असे सांगायची वेळ पालकांवर आली आहे. मुले सतत स्क्रीनवर असतात म्हणून त्यांना समुपदेशकांकडे नेऊन त्यांचे समुपदेशन करणे, वेगवेगळ्या छंदवर्गांना पाठवणे अशा गोष्टी पालकांकडून केल्या जात आहेत. मात्र त्याला किती मुलांकडून शून्य प्रतिसाद येतो. आई-वडील कामानिमित्त दोघेही दिवसभर घराबाहेर असल्यामुळे मुलांवर लक्ष ठेवणे अवघड होऊन बसते.

या सर्व गोष्टींच्या विचाराने नेहमीच अस्वस्थ होणारे आणि यासाठी काहीतरी केले पाहिजे हा हेतू समोर ठेवून काम करणारे नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये आणि संचालिका सीमा हेगशेट्ये हे दोघेही सतत नवनिर्माण हाय इंग्लिश मिडियम शाळेत तसेच नवनिर्माण कॉलेजमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असतात, जेणेकरून मुलांना आपला स्क्रीनटाइम कमी करता येईल. नेहमीच लांबून ऐकून असणाऱ्या या वेगवेगळ्या उपक्रमांचा साक्षीदार होण्याची संधी यंदा मिळाली. गेल्या चार महिन्यांपासून संस्थेत कार्यरत असल्याने संस्थेची विविध सामाजिक कार्य, उपक्रम जवळून बघता आले. अगदी टायनी टॉट्स या पूर्व प्राथमिक विभागापासून ते एस. पी. हेगशेट्ये वरिष्ठ महाविद्यालयापर्यंतच्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी वयोगटानुरूप कार्यक्रम घेऊन त्यातून वाचनसंस्कृती वाढविण्याचा सल्ला संस्थेचे अध्यक्ष आणि संचालिका दोघेही आपल्या मनोगतातून देत असतात. ‘अनावश्यक मोबाईल वापरापेक्षा पुस्तक वाचा, त्यातून भाषा, माणसे कळतील, ज्ञान वाढेल’ हे या दोघांचेही नेहमीच सांगणे असते. या दोघांचेही वाचन अफाट आहे, वेगवेगळी पुस्तके, कादंबऱ्या ते नेहमीच वाचत असतात हे त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून लक्षात येते. शाळेची, महाविद्यालयाची ग्रंथालये पाहिली की वाचनाप्रती त्यांची असलेली तळमळ दिसून येते.
या संस्थेच्या पुढाकाराने नवनिर्माण हाय या इंग्लिश मिडियम शाळेत नुकताच शाळेचा शेवटचा आठवडा धम्माल मस्तीसाठी राखीव ठेवला होता.

पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या (सीबीएससी बोर्ड) मुलांसाठी आठवडाभर वेगवेगळे कार्यक्रम ठेवले होते. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून त्यांच्यासमोर दुसरा पर्याय निर्माण करणे आणि मोबाईल व्यतिरिक्तही आणखी अनेक गोष्टी आहेत ज्यातून आपल्याला आनंद आणि समाधान मिळते हे मुलांना यातून दाखवायचे होते आणि हे केवळ मुलांपूरतेच मर्यादीत न ठेवता मुलांच्या आई-वडिलांनाही यात सहभागी करून घेतले होते. पहिली, दुसरी आणि तिसरीच्या मुलांसाठी ‘गम्मत जम्मत’ हा कार्यक्रम घेतला. यात आनंदाचे झाड हा आगळा वेगळा उद्घाटन सोहळा झाला. कुंडीत लावलेल्या झाडाला पर्यावरणाचे महत्त्व सांगणाऱ्या गोष्टींचे टॅग तयार करून लावले होते. नंतर मुलांनी ‘आई कुठे काय करते’ या अॅक्टिव्हिटीमध्ये आपली आई दिवसभर काय काय करत असते हे सांगितले. मुलांची उत्तरे आश्चर्यकारक होती. ही मुले आपले इतके बारीक निरीक्षण करत असतात हे त्यांच्या आयांनाही तेव्हाच समजले. या मुलांसाठी कलरिंग, आर्ट विथ नॅच्युरल मटेरियल, फनी गेम्स, फिंगर प्रिंट आर्ट अशा अॅक्टिव्हिटीज घेतल्या आणि उपस्थित माता पालकांसाठी ‘मुलांचा स्क्रीनटाइम कमी करायचा कसा’, ‘ओव्हर पॅटरेंटिंगचे तोटे’, ‘पालक आणि मुलांमधील संवादातील दुर्मिळता’ आणि ‘राजकीय घडामोडींचा शिक्षणावर होणारा चांगला/वाईट परिणाम’ हे विषय देऊन त्यावर ५ मिनिटे बोलायचा अवधी दिला होता. यात माता पालकांनी अगदी उत्स्फूर्तपणे सहभागी होत या विषयांवर आपली मते मांडली. त्यानंतर पालकांशी संवाद साधण्यात आला.

चौथी, पाचवीच्या मुलांसाठी ‘मॉम्स अँड किड्स’ हा कार्यक्रम घेतला. यात परफेक्ट मॅचिंग, बॉल इन बकेट, रिलेटेड वर्ड्स, माइंड रीडिंग अॅक्टिव्हिटी आई आणि मुले यांच्यासाठी घेतल्या. मोबाईल न बघता मुले आपल्या आईसोबत या खेळांत रमलेली दिसली. पालकांशी संवाद साधण्याच्या वेळी या आयांनी आपल्या मुला-मुलीसोबत क्वॉलिटी टाईम घालवता आल्याबद्दल सीमा मॅडमना विशेष धन्यवाददेखील दिले. सहावी आणि सातवीच्या मुलांसाठी वारली पेंटिंग घेतले गेले आणि त्यासाठी मुलांना कागदाऐवजी चक्क शाळेतील एका सभागृहाची भिंत उपलब्ध करून दिली.

कलाशिक्षकांच्या देखरेखीखाली या मुलांनी सभागृहाच्या भिंतींवर अतिशय सुंदर अशी वारली चित्रे साकारली. ही चित्रे काढताना त्या मुलांच्या चेहेऱ्यावरील समाधान हे सीमा मॅडम आणि त्यांच्या सर्व शिक्षकांचा हुरूप नक्कीच वाढवणारे होते. नववी ते बारावी या विद्यार्थ्यांसाठी एक क्वीज कॉम्पिटिशन घेण्यात आले. यातही मुलांनी हिरीरीने सहभागी होत आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली. वाळूशिल्प म्हणजे काय, ते कसे साकारले जाते याची शास्त्रशुद्ध माहिती दहावीच्या मुलांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार रवीराज चिपकर यांच्याकडून घेतली आणि स्वत:ही काही शिल्पे साकारली. त्यासाठी ही मुले सकाळी लवकर रत्नागिरी शहरातील भाट्ये समुद्र किनाऱ्यावर गेली होती. एका वेगळ्याच विषयाची माहिती घेताना तो शिकताना त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता.


या सर्वांत विशेष आकर्षण ठरले ते शाळेत दोन दिवस चाललेले ‘क्रिएटिव्ह अचिव्हर्स वर्कशॉप’. ही कार्यशाळा आठवी आणि नववीतील विद्यार्थ्यांसाठी होती. यात पत्रकार, लेखक, दिग्दर्शक, छायाचित्रकार, चॅनेल मॅनेजमेंट, थेट प्रक्षेपण विशेषज्ञ (लाईव्ह टेलिकास्ट), माध्यम सल्लागार असे हुशार व्यक्तिमत्त्व गिरीश केमकर आणि कंटेंट डिझायनर, दिग्दर्शक, मुक्त लेखक आणि निर्माती, निवेदक असलेल्या अमृता धायरीकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. कार्यशाळेची सुरुवात श्री. केमकर यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला ‘तुला कोण व्हायचे आहे’ हा प्रश्न विचारून केली. मुलांनी वेगवेगळी उत्तरे दिली. त्यावर केमकर सरांनी मुलांना ‘मला मी व्हायचे आहे’ हा पहिला धडा दिला. कोणा दुसऱ्यासारखे न बनता स्वत:तले गुण हेरून स्वत:ला तयार करा असे सांगितले. त्यानंतर दोन दिवस मुलांकडून वेगवेगळी सेशन्स घेण्यात आली. यात मुलांनी ८ मुलांचे ८ ग्रुप बनवले. या ग्रुपचे लीडरची निवड त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याच्या, गुणवत्तेच्या आधारावर मुलांनी एकमेकांची चर्चा करून केली. त्यानंतर सर्वांनी मिळून ग्रुपचे नाव ठरवणे, ध्येय ठरवणे हेही मुलांनी चर्चेच्या माध्यमातून त्यातून केले. यातून मुलांना सांघिक भावना महत्त्वाची आहे, हे शिकवण्यात आले. त्यानंतर या मुलांना मैदानावर झिप-झॅप गेम खेळायला सांगण्यात आला. त्यानंतर मुलांनी ते काय सादर करणार यावर चर्चा केली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांनी महिला अत्याचार, महिलांचे शिक्षण, रस्ता सुरक्षा, शिक्षणाचे महत्त्व अशा वेगवेगळ्या विषयांवर नाटिका तसेच नृत्य, गाणी सादर केली.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात अमृता धायरीकर यांनी मेडीटेशनने केली. यात मुलांनी मेडीटेशनसोबतच फिजिकल अॅक्टिव्हिटीही केल्या. त्यानंतर त्यांनी मुलांना एका एका सणाचे नाव सांगितले आणि त्या सणांशी संबंधित असलेले मराठी शब्द शोधायला सांगितले. हे शब्द गुगलबाबांची मदत न घेता शोधायचे होते. यात मुलांनी आपल्या विचारशक्तीचा उपयोग करत २० ते २५ शब्द शोधले. मोबाईलचा उपयोग न करताही आपल्याला माहिती मिळवता येते, शोधता येते हे मुलांना यातून समजले आणि इथून पुढे कमीत कमी मोबाईलचा वापर करू, असे आश्वासनही दिले. संध्याकाळच्या सत्रात सगळ्या कार्यक्रमांचे सादरीकरण करून मुले पालकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी मुलांनी दोन दिवस केलेल्या अॅक्टिव्हिटीज खूप उपयोग झाल्याचे सांगून सुट्टीतही मोबाईल न वापरता भावंडांशी हे खेळ खेळू आणि त्यांनाही शिकवू असे सांगितले. हे सर्व उपक्रम साध्य करण्यासाठी नवनिर्माण हायचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्यही मिळाले.

एकूणच काय तर मुलांना रुचतील, पटतील असे पर्याय द्यायला मोठेच कमी पडत आहेत. मोबाईल, टीव्हीसाठी मुलांना असे योग्य आणि त्यांचे मन रमवणारे पर्याय उपलब्ध करून दिले, तर अभ्यासाव्यतिरिक्त अनावश्यक असलेला मुलांचा स्क्रीनटाइम नक्कीच कमी होऊ शकतो. त्यासाठी सातत्याने प्रयत्न मात्र केले पाहिजेत.



