पर्यटनमुख्य बातमी

गणपतीपुळेत पर्यटकांची गर्दी

रत्नागिरी : तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र गणपतीपुळे आता पर्यटकांनी गजबजून गेले असून, विनायकी चतुर्थी आणि त्याला जोडून शनिवार, रविवारी सुट्ट्या आल्यामुळे पश्‍चिम व उत्तर महाराष्ट्रातील पर्यटकांनी समुद्र किनारी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. लोकसभा निवडणूक आणि वाढत्या तापमानामुळे कोकणातील समुद्र किनार्‍यांना पर्यटकांची प्रतिक्षाच होती; मात्र गेले दोन-तीन दिवस झालेल्या गर्दीने गणपतीपुळ्यातील व्यावसायिकही सुखावले आहेत.

सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणूक आणि वाढते तापमान याचा परिणाम पर्यटनावर झाला असून, कोकणातील पर्यटकस्थळांवर गर्दीचा लवलेश नव्हता. दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीलाच कोकणातील किनारे पर्यटकांनी फुलून जातात. मात्र यंदा ही गर्दी अद्याप नव्हती. ७ मे रोजी कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रातील मतदान झाल्यानंतर पर्यटकांची पावले आता हळूहळू समुद्रकिनार्‍यांकडे वळू लागली आहेत. शनिवारी विनायकी चतुर्थी होती. त्यानंतर जोडून रविवार आल्यामुळे पर्यटकांनी गणपतीपुळेला प्राधान्य दिले होते. कोल्हापूर, सातारा, सांगली या परिसरातील पर्यटक मोठ्या संख्येने गणपतीपुळे येथे आले होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेल्या भागातील अनेक गाड्या आल्याचे णपतीपुळेतील व्यवसायिकांनी सांगितले. मुंबई, पुण्यातील निवडणूक पुढील आठवड्यात पूर्ण होणार असल्याने तेथील पर्यटक पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे. फिरायला बाहेर पडणारा सरकारी कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्यामुळे त्याचा पर्यटनावर परिणाम झाला आहे.

दरम्यान, शनिवारी (११ मे) दिवसभरात सुमारे २० हजार पर्यटकांनी हजेरी लावल्याचे मंदिर प्रशासनकाडून सांगण्यात आले. रविवारीही तेवढीच गर्दी होती. त्याचा फायदा किनार्‍यावरील फेरीवाल्यांना झाला. पर्यटक फेरीबोटी, जेटस्की, बलूनद्वारे समुद्र सफर करताना दिसत होते. उंट, घोडे सवारीत अनेकजण व्यस्त होते. तर फोटो सेशन करणार्‍यांचीही कमी नव्हती. दिवाळी, ख्रिसमसनंतर प्रथमच एवढी गर्दी गणपतीपुळे पहायला मिळाली. हॉटेलबरोबरल निवासही फुल्ल होती. दोन दिवसांमध्ये एक कोटीच्या घरात उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यंदा हंगाम १० जूनपर्यंत राहिल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button