मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

पुरात वाहून गेलेली वीजवाहिनी पुन्हा जोडण्यासाठी त्यांनी पोहत नदी केली पार

राजापूर : राजापुरातील अर्जुना नदीला आलेल्या पुरात नदीच्या काठावरील शिळ, पावसकरवाडी व उन्हाळे मोंडेवाडी या दोन गावांना जोडणारी वीजवाहिनी वाहून गेली होती. ही तुटलेली वाहिनी जोडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील नौका विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सांरग व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोपट शिंदे या दोघांनी अर्जुना नदी पोहून पार करत वीजवाहिन्या पलीकडे नेल्या. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

राजापूर तालुक्यात रविवारी मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे अर्जुना नदीला पूर आल्याने नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या शिळ, पावसकरवाडी व उन्हाळे मोंडेवाडी या दोन गावांना जोडणारी विद्युत वाहिनी पुराच्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली होती. त्यामुळे दोन्ही गावातील वीज पुरवठा सुमारे ५ दिवस खंडीत होता. ही वीजवाहिनी जोडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन नौका विभागला मदतीसाठी पाचारण करण्यात आले.

नौका विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कृष्णा सारंग व त्यांचे सहकारी यांनी दोन्ही गावाची पाहणी केली असता अर्जुना नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे आपत्कालीन बोट अर्जुना नदीत उतरवणे धोक्याचे ठरणार होते. त्यामुळे त्यांनी अर्जुना नदी पोहून पार करण्याचा धाडसी निर्णय घेतला. दोन्ही गावांना जोडणारी विद्युत वाहिनी दोरीला बांधून श्री. सारंग व त्यांचे सहकारी शिंदे यांनी अर्जुना नदी पोहून पार करून दोन्ही गावांचा खंडित झालेला विद्युत प्रवाह जोडून देण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.

या कामी महावितरणचे अभियंता सनी पवार, वायरमन अक्षय भेरे, अभिनंदन सातोसे, लाईनमन मनोज पाटकर यांच्यासह राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील येलके, राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सचिन वीर, राजापूर नगर पालिकेचे मुख्य अधिकारी प्रशांत भोसले व त्यांचे सहकारी यांचेही सहकार्य लाभले. खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button