भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या प्रयत्नांमुळे एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार न्याय

रत्नागिरी : आधार आणि पॅन कार्ड लिंक नसल्याच्या कारणास्तव एसटी कर्मचाऱ्यांना सोसाव्या लागण्याऱ्या आर्थिक भुर्दंडाची माहिती मिळाल्यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी राज्य परिवहन महामंडळाचे रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोडसे यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेतून सुवर्णमध्य काढण्यात आला असून, राजेश सावंत यांच्या प्रयत्नांमुळे एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मे २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने ते लिंक करून घेणे आवश्यक होते आणि ही माहिती टीडीएसद्वारे शासनाला दिली गेली; परंतु टीडीएस रिटर्न दाखल करण्याची मुदत आणि आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत ३१ मे २०२४ असताना त्यापूर्वीच म्हणजे कर्मचाऱ्यांनी आधार-पॅन लिंक करण्यापूर्वीच रत्नागिरी एसटी महामंडळ कार्यालयाने टीडीएस रिटर्न दाखल केल्याने, इन्कम टॅक्स विभागाला आधार आणि पॅन लिंक नसणाऱ्या कर्मचाऱ्यांचीदेखील माहिती देण्यात आली. महामंडळाने ही माहिती इन्कम टॅक्सला दिली. आपल्या कर्मचाऱ्यांची ही माहिती दिल्याने याच्या परिणामांचा विचार यावेळी करण्यात आला नाही. परिणामी टीडीएसची नोटिस एसटी महामंडळाला आली. त्यानंतर एसटी महामंडळाने ज्यांचे आधार आणि पॅन लिंक नाही अशा कर्मचाऱ्यांवर हा भुर्दंड लावण्यात आला आणि ६० हजार ते ७० हजार रुपये कर्मचाऱ्यांकडून जुन व जुलै महिन्याच्या पगारातून वसूल करण्याचे आदेश दिले होते. यामुळे प्रति महिना कोणाचे ३० हजार, तर कोणाचे ३५ हजार याप्रमाणे पगारातून कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मुळातच कमी पगार असल्याने कर्मचाऱ्यांचे नुकसान होत होते. त्यातच अनेकांची कर्ज प्रकरणे, शालेय खर्चाचे करायचे काय याबाबत कर्मचाऱ्यांसमोर प्रश्न उभा राहिला.
ही बाब तेथील कर्मचाऱ्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली. कोणतीही पूर्व कल्पना न देता ही वसूली लावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पहायला मिळत होती. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही आम्हाला न्याय मिळाला नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी तातडीने आपल्या पदाधिकाऱ्यांसह तेथील अधिकारी यांची भेट घेतली व याबाबत सविस्तर चर्चा केली. महमंडळाने कर्मचाऱ्यांवर वसूली न लावता या नोटीशीचा अभ्यास करून टॅक्स मार्गदर्शन यांच्याकडून मार्गदर्शन घ्या व उपाययोजना करा, असे राज्य परिवहन महामंडळाचे रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोडसे यांना सांगितले. याबाबत कायदेशीर मार्गदर्शन घेतो आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातून टॅक्स वसुलीची नोटीस मागे घेतो, यातून काहीतरी मार्ग काढूया असा मार्ग यावेळी काढण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या प्रयत्नांमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून होणारी ही वसूली थांबल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
एसटी कर्मचारी यांना मी याबाबत मदत करू शकलो याचा मला आनंद असल्याचे राजेश सावंत यांनी बोलताना सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह तालुकाध्यक्ष दादा दळी, तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, युवा तालुकाध्यक्ष संकेत कदम, प्रदीप पटवर्धन, कर सल्लागार आदी कार्यकर्ते आणि एसटी कर्मचारी उपस्थित होते.



