एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी १२ जुलैला स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
हॉटेल मॅनेजमेंट विभागाची आणि अभ्यासक्रमाची माहिती व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये यांनी हॉटेल मॅनेजमेंटमधील फ्रंट ऑफिस, फूड अँड बेवरेज, प्रॉडक्शन, हाऊस कीपिंग या विभागांची माहिती दिली. तसेच करियर करण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी कॉलेजच्या होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.
हॉटेल मॅनेजमेंट विभागप्रमुख प्रा. ताराचंद ढोबळे यांनी या अभ्यासक्रमाविषयी तसेच या माध्यमातून दिले जाणारे प्रशिक्षण आणि प्रॅक्टिकल्स, प्लेसमेंट याविषयी सविस्तर माहिती दिली. दरम्यान उपस्थित मान्यवर, विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी प्रा. मेघना शेलार, सोनाली साठे, अथर्व खांडेकर यांनी खानपानाची व्यवस्था केली होती. प्रारंभी हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे सर्व मान्यवर, विद्यार्थी, पालक यांचे स्वागत करण्यात आले. मैथिली लिंगायत हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



