रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपाचे कमळ फुलणार : नारायण राणे

रत्नागिरी : “महायुतीतील सर्व पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी अतिशय मेहनतीने काम केल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाचे कमळ फुलणार,” असा विश्वास महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.
७ मे रोजी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर राणे यांनी रत्नागिरीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्या आधी त्यांनी महायुतीच्या निवडणूक कार्यालयाला भेट देऊन सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे आभार मानून भाजपच्या विजयाचे शिल्पकार हे सर्वचजण असल्याचे स्पष्ट केले.
ते म्हणाले, “महायुतीतील तिन्ही पक्षांच्या सगळ्याच लोकांनी चांगलं काम केले त्यामुळे वातावरण विजयाचे बनले आहे, याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो. या मतदारसंघातून लढण्याची संधी दिल्याबद्दल भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नद्दा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना धन्यवाद देतो.”
महायुतीच्या प्रत्येकाने चांगले काम करत असतानाच रत्नागिरीमध्ये पालकमंत्री उदय सामंत आणि शिवसेना नेते किरण सामंत यांनीही महायुतीसाठी चांगले काम केल्याचे ना. राणे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
- रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात मतदान ६० टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे याचाच अर्थ ते महायुतीसाठी चांगले आहे. वाढलेले मतदान हे मला यशाची खात्री देत आहे. ६० टक्क्यांपेक्षा जास्त झालेले मतदान म्हणजे ४ जूनला धमाका होणार आहे आणि तीन लाखांपेक्षा जास्त मते घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ४ जूनला विजयाचा धमाका होईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.



