माझ्या मोबाईलच्या सीममध्ये तांत्रिक प्रॉब्लेम : किरण सामंत
दिवसभर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम

रत्नागिरी : “परवा रात्रीपासून माझ्या मोबाईलच्या सीममध्ये तांत्रिक प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे माझा फोन लागत नव्हता. पण कार्यकर्ते माझ्या संपर्कात होते. माझ्या ड्रायव्हरचा, तसेच बॉडीगार्डचा फोन सुरू होता. त्यावरून माझा इतरांशी संपर्क होत होता,” असे स्पष्टीकरण किरण सामंत यांनी काल (७ मे) संध्याकाळी दिले.
काल सकाळपासून दिवसभर किरण सामंत यांचा फोन नॉट रिचेबल होता. संध्याकाळी ४.३० च्या दरम्यानचे त्यांनी आपल्या पत्नीसह पाली येथे मतदान केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपला फोन का लागत नव्हता याचे कारण स्पष्ट केले.
ते म्हणाले, “रात्री १२ वाजेपर्यंत मी मतदारसंघात काम करत होतो. सकाळी सात वाजताच मी घराबाहेर पडलो. सगळे काम पूर्ण केले आणि पत्नीला कळवले की साडेचार वाजेपर्यंत येतोय त्यानंतर मतदान करायला जाऊ. त्यानुसार आता येऊन मतदान केले. माझा फोन सीममध्ये तांत्रिक प्रॉब्लेम झाल्यामुळे सकाळपासूनच बंद होता; मात्र माझ्यासोबत असणारे माझे बॉडीगार्ड, गाडीत माझ्यासोबत असणारा माझा ड्रायव्हर या सगळ्यांचे फोन सुरू होते.”
फोन बंद असण्यावरून दिवसभर सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेत काहीच तथ्य नसल्याचे किरण सामंत यांनी स्पष्ट केले.



