गणपतीपुळ्यातील पर्यावरणपूरक मतदान केंद्र ठरतेय आकर्षण’
प्राचीन कोकण म्युझियमच्या माध्यमातून साकारला अनोखा देखावा

रत्नागिरी : रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातील गणपतीपुळे येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा हे मतदान केंद्र आकर्षण ठरले आहे. मतदानाबरोबरच निसर्ग संरक्षण महत्त्वाचे हा संदेश येथे निसर्ग पर्यटन केंद्र साकारून देण्यात आला आहे. यासाठी जिल्हाधिकारी मा. एम देवेंदर सिंह यांच्या पुढाकाराने आणि गणपतीपुळ्याच्या प्रसिद्ध प्राचीन कोकण म्युझियमचे संचालक वैभव सरदेसाई यांच्या संकल्पनेतून साकारले.
आज (७ मे) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मधील तिसऱ्या टप्प्यातील मतदार महाराष्ट्रात होत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातही अत्यंत उत्साहात, कर्तव्य आणि जबाबदारीचे भान ठेऊन मतदान शांततेत सुरू आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मा. एम देवेंदर सिंह यांनी मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे तसेच मतदान जेवढे महत्त्वाचे तेवढेच निसर्ग रक्षणही महत्त्वाचे आहे ही संकल्पना मतदारांपर्यंत पोहोचायला हवी असा विषय मांडला. या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी पर्यावरण केंद्राच्या उभारणीसाठी गणपतीपुळ्याच्या प्रसिद्ध प्राचीन कोकण म्युझियमचे संचालक वैभव सरदेसाई यांच्याकडे त्यासंदर्भात देखावा तयार करण्याची विनंती केली होती. गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण हे म्युझियम हे गेली २० वर्षे निसर्ग रक्षणाचेच कार्य करत आहे. त्यासाठी त्यांनी नियोजन करून आपल्या कल्पनेतून सदर शाळेत विविध रूपात पर्यावरणाशी निगडीत गोष्टींचा समावेश करून निसर्ग पर्यटन केंद्र साकारले. कोकणचा समृद्ध निसर्ग दाखवणारा देखावा मतदारांसाठी तयार केला.
कोकणामध्ये सर्व साधारणपणे आढळणारे बिबटे, ब्लॅक पँथर, हरीण आदींचा समावेश या दृश्यात केला आला. समृध्द जलाशय त्यामागचे हिरवेगार जंगल आणि त्या जंगलासमोर विहारणारे जंगलातील विविध जंगली प्राणी हे एकोप्याने या दृष्यामध्ये आपल्याला नांदताना दिसतात. पाणवठा एक आहे पण जंगलातील सगळे प्राणी त्या ठिकाणी एकत्र येऊन सहजीवन अनुभवत आहेत, अशी संकल्पना तयार केली गेली आहे. तसेच एक सेल्फी पॉइंट तयार केलेला आहे त्यामध्ये कोकणामध्ये आढळणारी कासवे, खवल्या मांजर, दुर्मिळ होत चालणारे ग्रेट इंडियन हॉर्नबिल म्हणजेच धनेश पक्षी आणि बिबट्या या सगळ्यांबरोबरचे सहजीवन आपण जगलो तरच कोकणचा समृध्द निसर्ग टिकून राहिल आणि तो टिकविण्यासाठी झाडे वाचवायला हवीत असा संदेश या दृष्यातून देण्याचा प्रयत्न केला गेला आणि या संकल्पनेस उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी हा देखावा सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल प्राचीन कोकण म्युझियम चे संचालक वैभव सरदेसाई यांनी त्यांचे आभार मानले.



