मराठी माणसाची उद्योगातील टक्केवारी वाढणे गरजेचे” खासदार नारायण राणे

देवरुख : “कोणीही आपले कौतुक केले तर लगेच भारावून जाऊ नये. प्रथम आत्मपरीक्षण करून आपण त्या कौतुकास पात्र आहोत का याचा विचार करावा. वयाच्या 15 व्या वर्षी मी राजकारणात आलो. हिंदुत्व व मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारे काम मी केले. आज मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते व जनसमुदाय उपस्थित आहे. या संख्येवरूनच माझे काम आणि माझ्यावरील जनतेचे प्रेम दिसते” असे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी देवरुख येथील सदिच्छा कार्यक्रमात केले.
देवरुख मराठा भवन येथे भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुक्याच्या वतीने आज खासदार नारायण राणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राणे यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधत आपले राजकारणातील अनुभव सांगितले. तसेच कोकणच्या तरुण पिढीसाठी मोलाचे असे मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदर विभागाचे मंत्री नितेश राणे, आमदार शेखर निकम, आमदार निलेश राणे, माजी आमदार सुभाष बने, सदानंद चव्हाण, प्रमोद जठार, राजेंद्र महाडिक, सौ.निलम राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपचे जेष्ठ नेते मुकुंद जोशी, क्षेत्राध्यक्ष प्रमोद अधटराव, महिला जिल्हा उपाध्यक्ष संगिता जाधव, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रमोद पवार, रश्मी कदम, सदानंद भागवत, भाजप तालुकाध्यक्ष रुपेश कदम, उत्तरचे विनोद म्हस्के, राजेश पत्याणे, शिल्पा सुर्वे, दिलीप सांवत, अभिजित शेट्ये, अभिजित सप्रे, निलेश भुरवणे, तहसिलदार अमृता साबळे आदिसह महायुतीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री. राणे म्हणाले की, कोकणात उद्योग-धंदे येतील मात्र त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण कोकणातील मुलांनी घ्यायला हवे आणि तरच इथली पदे इथेच भरतील. कष्ट करण्यासाठी लाज न बाळगता कोकणच्या मराठी माणसाने काम केले पाहिजे. मराठी माणसाची उद्योग-धंद्यात काम करण्याची टक्केवारी वाढली पाहिजे, तरच समृद्ध असे कोकण घडेल आणि देशाच्या नकाशात समृद्ध कोकण असे स्पष्ट दिसेल. कोकणच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी मी केव्हाही हजर असेन. चरस, गांजा यांसारख्या गोष्टी जे तरुण पिढीला वाया घालवत आहेत, त्या आता बंद झाल्या पाहिजेत, यावर देखील आपण कठोर पावले उचलणार आहोत असेही श्री. राणे शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी आमदार प्रमोद जठार यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना गेली 50 ते 55 वर्षे कोकणी माणसाच्या भल्यासाठी झटणारे नेतृत्व म्हणजे नारायण राणे साहेब असा उल्लेख केला. तर आमदार शेखर निकम यांनी शुभेच्छा देताना नारायण राणे साहेब म्हणजे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. तसेच कोकणात त्यांचा दबदबा आहे, तर राणे साहेबांच्या मनातील प्रत्येक गोष्ट पूर्ण व्हावी अशी शुभेच्छा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देत नारायण राणे साहेब म्हणजे विरोधकांना आपलंस करणारे व्यक्तिमत्व होय. संघर्ष हा त्यांच्याकडून शिकला पाहिजे. आज कोकणात अनेक उद्योग येत आहेत. यामध्ये आपल्या जिल्ह्यातीलच मुले लागली पाहिजेत असा संकल्प आज राणे साहेबांच्या वाढदिवसा निमित्ताने करूया असे शेवटी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश भुरवणे, प्रास्ताविक रुपेश कदम व आभार प्रदर्शन सुशांत मुळ्ये यांनी केले.
दरम्यान, कार्यक्रमात देवरुख येथील साहस संस्था, राजु काकडे हेल्प अकॅडमी, गणेश वेदपाठशाळा, साडवली चे नवनिर्वाचित उपसरपंच अभिजित सप्रे, रांगोळी कलाकार विलास रहाटे, आदर्श सरपंच म्हणून घोषित करण्यात आलेले तालुक्यातील सरपंच या सर्वांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.



