आता प्रत्येक रुग्णालयात आरोग्यदूत :, पुण्यातील प्रकरणानंतर मोठा निर्णय!

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भाजपचे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सचिव सुशांत भिसे यांच्या पत्नीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गर्भवती असेलल्या तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैशाअभावी वेळेत उपचार न दिल्याने तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या रूग्णालयाच्या समोर आंदोलने केले जात आहे. त्याचबरोबर या रूग्णालयाची चौकशी सुरू आहे. अशातच आता वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. यासारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आता प्रत्येक रुग्णालयात आरोग्यदूतची नेमणूक केली जाईल. धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत आरोग्य यंत्रणेमार्फत रुग्णालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवले जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या मिसाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणावर त्यांनी भाष्य केले. रुग्णालयाच्या आडमुठेपणामुळे तनीषा भिसे यांना प्राण गमवावे लागल्याचा आरोप होत आहे. तनीषा यांनी सातव्या महिन्यात जुळ्या मुलींना जन्म देऊन जगाचा निरोप घेतला. या प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनावर कारवाईसाठी दबाव वाढत असल्याने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिले आहेत.
आरोग्य उपसंचालक राधाकिसन पवार यांनी या प्रकरणात चार सदस्यीय चौकशी समिती नियुक्ती केली आहे. यासंदर्भात मिसाळ म्हणाल्या की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जो प्रकार घडला आहे, त्याबाबत चौकशी केली जाणार असून आता प्रत्येक रुग्णालयात आरोग्यदूतची नेमणूक केली जाणार आहे.
धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत असणारा आरोग्यदूत रुग्णालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवणार आहे. धर्मादाय रुग्णालयात सेवा मिळत नाही, त्यामुळे धर्मादाय समितीअंतर्गत रुग्णालयात आरोग्यदूत नेमणार आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत समिती असते ती याबाबत देखरेख ठेवेल, असे माधुरी मिसाळ यांनी सांगितले.



