एप्रिलमध्ये महाराष्ट्र अधिक तापणार; देशात चटका वाढणार !

पुणे – यंदाच्या उन्हाळी हंगामात (एप्रिल ते जून) देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत उन्हाचा चटका तापदायक ठरणार असून, राज्यात तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. एप्रिल महिन्यात महाराष्ट्र अधिक तापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
उन्हाळा हंगामातील (एप्रिल ते जून) तापमानाचा अंदाज सोमवारी (ता. ३१) हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला. उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता अधिक आहे.
एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत दक्षिण द्वीपकल्पाचा उत्तर आणि पूर्व भाग, मध्य, पूर्व आणि वायव्य भारतामध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून महिन्यात साधारणतः २ ते ४ दिवस कालावधीच्या उष्ण लाटा अनुभावायला मिळणार आहेत.
*एप्रिलमध्ये उष्ण लाटा अन् पाऊस*
एप्रिल महिन्यात राज्यासह देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. यात सलग २ ते ५ दिवस कालावधीच्या उष्ण लाटा अनुभावायला मिळण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्ण लाटांचा इशारा आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही काही प्रमाणात उष्ण लाटा दिसून येतील.



