देवी जाखमाता आणि निनावी देवीचा शिंपणे उत्सव
लाल रंगाची उधळण; मटण भाकरीचा प्रसाद

संगमेश्वर : महाराष्ट्रात प्रसिध्द असणारा संगमेश्वर येथील देवी जाखमाता आणि निनावी देवीचा शिंपणे म्हणजेच रंगपंचमी उत्सव संगमेश्वर तालुक्यात शुक्रवार दि. २८ मार्च रोजी संगमेश्वरसह, कसबा याठिकाणी संपन्न होणार आहे. या उत्सवाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे .
संपूर्ण महाराष्ट्रात ज्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते त्या दिवशी संगमेश्वर तालुक्यात केली जात नाही . फाल्गुन अमावस्येला बलिदानास योग्य दिवस पाहून ही रंगपंचमी साजरी केली जाते . यालाच देवी जाखमातेचा आणि निनावी देवीचा शिंपणे उत्सव असे म्हणतात . यावर्षी हा उत्सव शुक्रवार दि. २८ मार्च रोजी संपन्न होत आहे.
या उत्सवात लाल रंगाची दिवसभर उधळण करुन भाविक देवीला रखवालीचे आणि नवसाचे जे नारळ, कोंबडे आणि बोकड अर्पण करतात त्याचा प्रसाद करुन रात्री मटण भाकरीच्या प्रसादाने दिला जातो आणि या उत्सवाची सांगता होते. या उत्सवात निघणारे रंगाचे फेरे हा येणाऱ्या भक्तगणांसाठी खास आकर्षणाचा विषय ठरतो..सर्वधर्म एकता आणि पारंपारिकता जपणाऱ्या या उत्सवात माहेरवाशिणी येऊन आनंद द्विगुणित करतात.



